11th October In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही. भारतातील संपूर्ण क्रांतीच्या घोषणेचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांची आज जयंती आहे. तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन आहे. मागील अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे.

1902 : स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म

जयप्रकाश नारायण हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

जयप्रकाश नारायण हे 1922 मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्या ठिकाणी त्यांचा परिचय मार्क्सवादी विचारांशी आला. . मानवेंद्रनाथ रॉय यांचा ‘आफ्टरमाथ ऑफ द नॉन-को-ऑपरेशन’ हा निबंध व मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की यांचे साहित्य वाचून ते कट्टर मार्क्सवादी बनले.

1930 मध्ये जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी जयप्रकाशांना काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रमुख नेमले. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसऱ्या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाशांनी चळचळीची सूत्रे सांभाळली. 1933 मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.

1954 ते 1972 पर्यंत जयप्रकाश भूदान आंदेलनातच मग्न होते. परंतु या काळातही त्यांनी काही महत्त्वाची राजकीय कामे केली. 1960 मध्ये नवी दिल्ली येथे त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली; 1962मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने‘पाकिस्तान रिकन्सिलिएशन ग्रुप’ स्थापन केला; नागालँडमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते.

जयप्रकाशांच्याप्रयत्नाने 1964 मध्ये भारत सरकार व नागा बंडखोर पुढारी यांत युद्धविराम तहावर सह्या झाल्या. 1965 मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल मेगॅसेसे पुरस्कार मिळाला.

इंदिरा गांधी यांची निवडणूक अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांनी राजीनामा द्यावा आणि लष्कर, पोलिसांनी या बेकायदेशीर सरकारच्या आदेशाचे पालन करू नये असे आवाहन केले. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात दिल्लीत मोठी सभा झाली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्यात जयप्रकाश नारायण यांना अटक करण्यात आली.

1942 : चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जन्म

भारतीय चित्रपटसृष्टीचे शहेनशहा अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिन. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी निवेदक म्हणून रेडिओवर मुलाखत दिलेल्या अमिताभ बच्चन यांना आवाज खराब असल्याने नोकरी नाकारण्यात आली. मात्र, त्याच अमिताभ यांनी आपल्या खास आवाजातील संवादफेकीने मागील अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य कायम राखले आहे.

1969 मध्ये भुवन शोम या चित्रपटात निवेदकाचा आवाज म्हणून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली. अमिताभ यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू केली. तिकीट बारीवर हा चित्रपट विशेष छाप सोडू शकला नाही. मात्र, अमिताभ बच्चन यांची या चित्रपटातील भूमिकेसाठी दखल घेण्यात आली. पुढे 1971 मध्ये आलेल्या आनंद या चित्रपटातील डॉ. भास्कर या व्यक्तिरेखेने छाप सोडली. चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असली तरी अमिताभ यांच्या कामाची दखल घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या जंजीर, दीवार आणि शोले यांसारख्या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्यांना भारताचा "अँग्री यंग मॅन" म्हणून संबोधले गेले.

अभिनयासोबतच बच्चन यांनी पार्श्वगायक, चित्रपट निर्माता आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. 1980 च्या काळात ते राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव अलाहाबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. बोफोर्स प्रकरणी राजीव गांधी यांच्यासह त्यांच्यावरही आरोप झाले होते. त्यानंतर अमिताभ यांनी राजकारणाला कायमचा रामराम केला.

अमिताभ यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील सुप्रसिद्ध कवी होते तर त्यांची आई तेजी बच्चन या मूळच्या फैसलाबाद (पाकिस्तान) येथील हिंदू शीख कुटुंबातील होत्या. अमिताभ यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.

अमिताभ बच्चन यांनी सुमारे 2000 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आपल्या कारकिर्दीची दुसरी इनिंग त्यांनी छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या टीव्ही शो पासून केली. त्याशिवाय, मोहब्बते या चित्रपटातून चरित्र अभिनेत्याच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. अमिताभ हे आपल्या कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रचंड यशस्वी झाले. त्यांनी याआधीचे सर्व अपयश धुवून काढले. बॉलिवूडमध्ये सर्वात व्यस्त असलेल्या कलाकारांपैकी एक आहेत

भारत सरकारने त्यांना कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल 1984 मध्ये पद्मश्री, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. 2007 मध्ये फ्रान्स सरकारने त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान, "नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.

1946 : परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅक चे निर्माते आणि संस्थापक विजय भटकर यांचा जन्म.

विजय भटकर हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ आहेत. परम सुपरकॉम्पुटर आणि सी. डॅकचे निर्माते आणि संस्थापक म्हणून भटकर यांना ओळखले जाते. भटकर यांचे मूळ गाव अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा हे अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव. भटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले. त्यांनी विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनीअरिंग कॉलेज, नागपूर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पी.एचडी. प्राप्त केली. विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखाली इलेक्ट्रॉनिक्स कमिशनची स्थापना 1968 साली झाली. त्या कमिशनवर भटकरांनी दहा वर्षे काम केले. ते इंदिरा गांधींनी 'इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार' साठी 1972 साली नेमलेल्या महत्त्वाच्या समितीचे सदस्य होते. त्यांनी त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना केली. ते या संस्थेचे संचालक होते. भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले.

1968 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा(Tukdoji Maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. 1925 मध्ये त्यांनी ‘आनंदामृत’ ग्रंथाची रचना केली. ते स्व:त भजन, कीर्तन, प्रवचन करत असत. त्यांनी खंजेरी वर उत्तम भजने गायली. 1995 च्या आसपास त्यांचा गांधीजींशी सहवास झाला. 28 ऑगष्ट 1942 पासून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने अटक झाली. त्यानंतर डिसेम्बरमध्ये त्यांची सुटका झाली. 5 एप्रिल 1943 रोजी त्यांनी श्री गुरुदेव मुद्र्नाल्याची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोहेंबर 1943 रोजी त्यांनी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांचे निधन झाले.

1987: श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे 'ऑपरेशन पवन'ची सुरुवात झाली.

ऑपरेशन पवन हे इंडियन पीस किपिंग फोर्स (IPKF) द्वारे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) कडून जाफना नियंत्रित करण्यासाठी केलेल्या ऑपरेशनचे कोड नाव होते. एलटीटीईच्या नि:शस्त्रीकरणासाठी भारत-श्रीलंका कराराचा एक भाग म्हणून 1987 च्या उत्तरार्धात ऑपरेशनची अंमलबजावणी करण्यात आली. काही आठवड्यांच्या क्रूर लढाईत, IPKF ने LTTE कडून जाफना द्वीपकल्पाचा ताबा घेतला. भारतीय सैन्याचे रणगाडे, हेलिकॉप्टरच्या पाठिंब्याने IPKF ने LTTE पार केले. 11 ऑक्टोबर 1987 हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी भारतीय लष्कराने ऑपरेशन पवन सुरू केले होते. भारतीय लष्कराने 1987 मध्ये श्रीलंकेत हे ऑपरेशन केले होते.

2008 : काश्मीर खोऱ्यात पहिली ट्रेन धावली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काश्मीर खोऱ्यात धावणाऱ्या पहिल्या ट्रेनला नौगाव स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.

इतर महत्त्वाच्या घटना :

1889: ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचे निधन.
1916 : चित्रपट व नाट्य अभिनेत्री रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर यांचा जन्म.
1951: हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचा जन्म.
1984 : कॅथरीन डी. सुलिव्हन या स्पेस वॉक करणाऱ्या पहिल्या महिला अमेरिकन अंतराळवीर बनल्या
1984: आक्रमक डावखुरे फलंदाज खंडेराव मोरेश्वर ऊर्फ खंडू रांगणेकर यांचे निधन.
2002: अभिनेत्री दीना पाठक यांचे निधन.

from maharashtra https://ift.tt/Zabk0xn
11th October In History : संपूर्ण क्रांतीचे प्रणेते जयप्रकाश नारायण यांचा जन्म, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निधन, बिग बी अमिताभ यांचा जन्म; आज इतिहासात...
October 10, 2023
0
Tags