1st October In History : प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या मोठ्या घटनेचा साक्षीदार असते. 1 ऑक्टोबर 1953 हा दिवस आंध्र प्रदेशची भाषेवार घोषणा झाल्यामुळे या दिवसाला आंध्र प्रदेशचा निर्मिती दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असणारे प्रतिभावंत लेखक, गीतकार मराठी विश्वातील गदिमा अर्थात ग.दि. माडगूळकर यांचा आज जन्मदिन आहे.

1847 : अॅनी बेझंट यांचा लंडनमध्ये जन्म झाला

डॉ. अॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 रोजी झाला. त्या एक अग्रगण्य अध्यात्मवादी, थिऑसॉफिस्ट, महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या, लेखिका, वक्त्या आणि भारतप्रेमी महिला होत्या. 1917 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाही झाल्या. अॅनी बेझंट यांच्या प्रेरणेने भारतातील अनेक समाजसेवकांना बळ मिळाले.

1854 : भारतात टपाल तिकीट सुरू झाले

आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर 1854 रोजी भारतात टपाल तिकीट सुरू झाले. अर्धा आना, एक आना, दोन आना आणि चार आना अशी टपाल तिकिटे काढण्यात आली. हे पहिले टपाल तिकीट त्यावेळच्या कलकत्ता आणि आताच्या कोलकाता येथे छापले गेले.

1906 : संगीतकार-गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म

सचिनदेव बर्मन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते. त्यांचा जन्म सध्या बांगलादेशात असलेल्या कोमिल्ला या ब्रिटिश भारतातील गावात झाला. चित्रपटसृष्टीत एस.डी. म्हणून परिचित असलेले सचिन देव बर्मन हे त्रिपुरातील राजघराण्यातील सदस्य होते. त्यांनी 1937 मध्ये बंगाली चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी हिंदी चित्रपटांसाठी संगीत देण्यास सुरुवात केली. एसडी बर्मन हे सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली भारतीय चित्रपट संगीतकार बनले. बर्मन यांनी बंगाली चित्रपट आणि हिंदीसह 100 हून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिले.

बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गीते किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, गीता दत्त, मन्ना डे, हेमंत कुमार, आशा भोसले, शमशाद बेगम, मुकेश आणि तलत महमूद यांच्यासह त्या काळातील आघाडीच्या गायकांनी गायली. पार्श्वगायक म्हणून बर्मन यांनी 14 हिंदी आणि 13 बंगाली चित्रपट गाणी गायली.

अष्टपैलू संगीतकार असण्यासोबतच त्यांनी बंगालच्या हलक्या अर्ध-शास्त्रीय आणि लोकशैलीतील गाणीही गायली. त्यांचा मुलगा आर.डी. बर्मन हे देखील प्रसिद्ध संगीतकार होते.

1919: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते ग. दि. माडगूळकर यांचा जन्म

गजानन दिगंबर माडगूळकर हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायणामुळे गदिमा यांना आधुनिक वाल्मिकी असेही म्हटले गेले. गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत 157 पटकथा आणि सुमारे 2000 गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिकाही साकारली आहे.

सांगलीतील शेटफळे गावात जन्म झालेल्या गदिमा हे मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले. पुढे घरची बेताची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी ते चित्रपट क्षेत्रात आले. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (1938), ब्रॅंडीची बाटली (1939) या सारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. 1942 मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. 1947 साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली.

गदिमांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत वंदे मातरम् (1948), पुढचे पाऊल (1950), बाळा जो जो रे (1951), लाखाची गोष्ट (1952), देवबाप्पा (1953), गुळाचा गणपती (1953), पेडगावचे शहाणे (1952), ऊनपाऊस (1954), मी तुळस तुझ्या अंगणी (1955), जगाच्या पाठीवर (1960), प्रपंच (1961), सुवासिनी (1961), संथ वाहते कृष्णामाई (1967), मुंबईचा जावई (1970) आदी चित्रपटांचा समावेश होतो.

त्याशिवाय, व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’, अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती.

गदिमा यांनी लिहिलेली बालगीते, भावगीते आजही प्रसिद्ध आहेत. नाचरे मोरा आंब्याच्या वनात.., झुक झुक झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, गोरी गोरीपान, फुलासारखी छान, दादा, मला एक वहिनी आण आदी बालगीते आजही लहान मुलांच्या तोंडी आहेत.

इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार, भाबड्या या भक्तासाठी, देव करी काम ! ही भक्तीगीते आजही लोकांच्या ओठी आहेत. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकू किंवा मरू, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ही देशभक्तीपर गीतेही गदिमांच्या लेखनीतून अवतरली आहेत.

बुगडी माझी सांडली ग... जाता साताऱ्याला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागंल कोल्हा, या चिमण्यानो परत फिरा रे, रम्यही स्वर्गाहून लंका ही गाजलेली चित्रपट गीतेही गदिमांची आहेत. गदिमा यांना भारत सरकारने पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केले होते.

1928 : दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म

शिवाजी गणेशन यांनी अनेक तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. 1952 सालच्या 'पराशक्ती' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. आपल्या पाच दशकांच्या अभिनयाच्या कारकीर्दीत त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांत काम केलं. त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर, 'काहिरा अॅफ्रो-आशियायी फिल्म फेस्टिवल'मध्ये पुरस्कार जिंकणारे शिवाजी गणेशन हे पहिलेच भारतीय अभिनेते होते.

चित्रपटात येण्यापूर्वी ते तमिळ नाटक "सिवाजी कांड इंद राज्यम" ह्या नाटकात प्रमुख भूमिकेत काम करित असत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत एक तमिळ नाटक होते आणि या भूमिकेवरून त्यांची ओळख "सिवाजी गणेसन" अशी पडली.

भारतीय चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

1953 : भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची घोषणा

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. मात्र हैदराबादच्या निजामाला भारतापासून आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे होते. परंतु, तेथील लोकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी चळवळ सुरू केली. हैदराबाद राज्यातील लोकांचा पूर्ण पाठिंबा असलेल्या ऑपरेशन पोलोच्या पाच दिवसांनंतर हैदराबाद राज्याला 1948 मध्ये भारतीय प्रजासत्ताकचा भाग बनण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर अमरजीवी पोट्टी श्रीरामुलू यांनी स्वतंत्र राज्य मिळविण्यासाठी आणि मद्रास राज्यातील तेलुगू लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लोक आक्रमक झाले. लोकांची आक्रमक भूमिका पाहून तत्कालीन भारत सरकारला तेलुगू भाषिक लोकांसाठी नवीन राज्य निर्माण करण्याची घोषणा करण्यास भाग पडले. त्यानुसार 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेशने कुर्नूलला आपली राजधानी घोषित करण्यासह भाषेच्या आधारावर राज्याचा दर्जा मिळवला. त्यामुळे हा दिवस आंध्र प्रदेशमध्ये राज्याचा भाषेनुसार निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना झाली आणि हैदराबादला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आले. त्या दिवसापासून 1 नोव्हेंबर हा दिवस आंध्र प्रदेश राज्याची स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

1958 : वजनासाठी मेट्रिक प्रणाली भारतात सुरू झाली

ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीशांनी देशभरात एकसमान मोजमाप पद्धत विकसित केली. वजनाची एकके मान, सेर, चंटक, तोळा, माशा आणि रत्ती अशी होती. जमिनीचे मोजमाप करण्यासाठी मैल, एकर, गज, फूट, इंच यांचा वापर केला जात असे. इंग्रजांनी विकसित केलेली ती व्यवस्था स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 1958 पर्यंत वापरली जात होती. 1958 मध्ये भारत सरकारने मोजमापाची नवीन मानके स्थापित केली आणि मोजमापाची मेट्रिक पद्धत देशभरात एक ट्रेंड बनली.

1967 : भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना

भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) ची स्थापना 1 ऑक्टोबर 1966 रोजी झाली. पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. देशातील प्रगतीशील विकास, प्रोत्साहन आणि पर्यटनाच्या विस्तारामध्ये ITDC ची मोठी भूमिका आहे. भारतीय पर्यटन विकास महामंडळाकडे देशातील प्रत्येक राज्य आणि महत्त्वाच्या भागात उत्तम हॉटेल आणि राहण्याची व्यवस्था आहे. भारतीय पर्यटन विकास महामंडळ संचालित सफारी लॉजमध्ये पर्यटकांसाठी वातानुकूलित राहण्याची सोय आहे.

इतर महत्त्वाच्या घटना :

1880: थॉमस एडिसनने विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला.
1919 : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म
1931: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन.
1971: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
1992: कार्टून नेटवर्क सुरु झाले.
1997: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (22.1”) गुल मोहम्मद यांचे निधन.
2002: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, 1988आणि मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला 304(भाग-2) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

from maharashtra https://ift.tt/nLulzDa
1st October In History : 'आधुनिक वाल्मिकी' ग. दि. माडगूळकर, संगीतकार सचिन देव बर्मन यांचा जन्म, भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची घोषणा; आज इतिहासात
September 30, 2023
0
Tags