31 July In History: 31 जुलैचा दिवस हा भारतासाठी महत्त्वाचा आहे. मुंबईला आज एक आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, त्याचा पाया रचण्यामध्ये मोलाचे योगदान असणारे नाना शंकर शेठ यांचे निधन आजच्या दिवशी झाले. तर, मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर जादूई आवाजाने अधिराज्य गाजवणारे पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधनही आजच्या दिवशी झाले. उपन्यास सम्राट मुन्शी प्रेमचंद यांचा आज जन्मदिवस आहे.

1865 : आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचे निधन

आधुनिक मुंबईचे शिल्पकार समजले जाणारे जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ मुरकुटे यांचा आज स्मृतीदिन. मराठी शिक्षण तज्ज्ञ, उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती म्हणून नाना शंकर शेठ यांची ख्याती होती. मुंबई शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोलाटा वाटा राहिला आहे. भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे दरम्यान धावली. ही रेल्वे सुरू करण्यात आणि रेल्वे सेवेचा विस्तार करण्यात नाना शंकरशेठ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.

नाना यांचा जन्म व्यापारी, सावकारी करणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांचे बालपण हे संपन्नेत गेले. मात्र, तरुणपणी त्यांनी मुंबई शहरासाठी आणि नागरिकांसाठी अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला, सार्वजनिक कामांसाठी खर्च करून टाकला. नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ 50 वर्षाच्या कालावधीत मुंबईच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला.

शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी मुंबईचा गर्व्हनर एल्‌फिन्स्टनने 1822 मध्ये हैंदशाळा आणि शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हीचे 1824 मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी चार लाख 43 हजार 901 रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (1837) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले.

सन 1855 मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची 1845 मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली. धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.

मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या. त्यातून मुंबईला आधुनिक शहर बनवण्याचा पाया रचला गेला. नाना शंकरशेठ यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले.

1880 : साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म

मुन्शी प्रेमचंद हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी 1913 ते 1931 पर्यंत एकूण 224 कथा, 100 लेख आणि 18 कादंबऱ्यांचे लेखन केले. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क'मध्ये 8 ऑक्टोबर 1903 पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थानवरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त झाली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

प्रेमचंद आधुनिक हिंदी साहित्याचे पितामह म्हणून ओळखले जातात. 1901 पासून त्यांच्या साहित्यिक जीवनाचा आरंभ सुरू झाला. पण त्यांची पहिली हिंदी कथा सरस्वती पत्रिकेत डिसेंबरच्या अंकात 1915 मध्ये 'सौत' या नावाने प्रकाशित झाली. त्यांचा पहिला कथासंग्रह 'सोजे वतन'. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असल्याने त्यांच्या पुस्तकांवर इंग्रज सरकारने बंदी घातली व अशा प्रकारचे लेखन करू नये म्हणून बजावण्यात आले.

1907: भारतीय गणितज्ञ, सांख्यिकीशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या पंडित दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्मदिन

दामोदर धर्मानंद कोसंबी हे मराठी गणितज्ञ व इतिहाससंशोधक होते. यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला. बौद्ध तत्त्वज्ञानाचे व पाली भाषेचे अभ्यासक धर्मानंद दामोदर कोसंबी हे यांचे वडील होत.

सांख्यिकीमध्ये, कोसंबी-करहुनेन-लोव्ह प्रमेयाद्वारे स्टोकेस्टिक प्रक्रियेसाठी ऑर्थोगोनल अनंत मालिका अभिव्यक्ती विकसित करणारे ते पहिले व्यक्ती होते. अंकशास्त्रातील त्यांच्या कार्यासाठी आणि प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या गंभीर आवृत्त्या संकलित करण्यासाठी देखील ते प्रसिद्ध आहेत.

दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या ॲन इंट्राॅडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री या ग्रंथात भारताच्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, घटनांचे विश्लेषण, मार्क्सवादी दृष्टी, ऐतिहासिक साधने व संशोधन या बाबींची चिकित्सा केली आहे. इतिहास म्हणजे साधन व उत्पादन यांच्या परस्परसंबंधातील एक कालानुक्रमावर आधारित घटना आहे असा त्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोन होता.

सिंधु संस्कृतीची अर्थव्यवस्था, मौर्यांची उत्पत्ती, भारतीय समाजरचना, स्त्री व शूद्रांची स्थिती, भारत-रोमन व्यापार, आर्यांचा विस्तार, मौर्य साम्राज्याची अर्थस्थिती यांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन मांडले.

1947 : अभिनेत्री मुमताज यांचा जन्मदिन

60 आणि 70 च्या दशकात प्रमुख अभिनेत्री आणि नृत्यंगना म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस. छोट्या, सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मुमताज यांनी प्रमुख अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. सोने की चिड़िया (1958) या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. 1971 सालच्या 'खिलौना' ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. राजेश खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेत त्यांनी 10 चित्रपटांमध्ये काम केले.

1980 : पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन

लोकप्रिय पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतीदिन. रफी यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भारतीय उपखंडातील महान आणि प्रभावी गायकांपैकी एक मानले जाते. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

रफी यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये वेगवान पेपी नंबर ते देशभक्तीपर गीते, दर्द असणारी गाणी , अत्यंत रोमँटिक गाणी , कव्वाली ते गझल आणि भजनांमध्ये शास्त्रीय गाणी अशी विविधता होती. एखाद्या अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेवर आणि शैलीनुसार आपला आवाज काढण्याच्या क्षमतेसाठी, चित्रपटात स्क्रीनवर गाण्याचे लिप-सिंक करून दाखवणासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी हिंदी भाषा, उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलुगू भाषांमधून गाणी गायली. मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, हेमंत कुमार मुखोपाध्याय आणि तलत मेहमूद यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या 1950 ते 1980 च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते. रफी यांनी उस्ताद अब्दुल वहीद खान, पंडित जीवनलाल मट्टू आणि फिरोज निजामी यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी लाहोरमध्ये के. एल. सैगल यांचे गीत गायले.

1967 मध्ये रफी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांना सहा फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

रफी यांनी गायलेली पहाटे पहाटे मला जाग आली, शोधिसी मानवा राउळी मंदिरी, हा छंद जिवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, प्रभू तू दयाळु कृपावंत दाता, अगं पोरी संभाल आदी मराठी गाणी आजही प्रसिद्ध आहेत.

इतर महत्त्वाच्या घटना

1498: पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युरोपीयन ठरले.
1919: भारतीय क्रिकेटपटू हेमू अधिकारी यांचा जन्म.
1933: महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रम सोडला.
1948: भारतात कलकत्ता शहरात प्रथम राज्य सेवा परिवहनाची स्थापना करण्यात आली.
1956: कसोटी सामन्यातील एका डावात सर्व 10 गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला. या कसोटी सामन्यात त्याने 19 बळी घेतले.
1982: सोवियत संघाने आण्विक चाचणी केली.
1992: भारत रत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय सतारवादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
2006: फिडेल कॅस्ट्रो यांनी आपला भाऊ आणि क्यूबन क्रांतीमधील सहकारी, कम्युनिस्ट नेते राऊल कॅस्ट्रो यांच्याकडे सत्ता सोपवली. जवळपास सहा दशकानंतर फिडेल यांनी सत्तासूत्रे सोडली.

from maharashtra https://ift.tt/JWzvuwX
31 July In History: आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ, पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन
July 30, 2023
0
Tags