ST News : लालपरी अर्थात एसटीसाठी (ST) महामंडळाकडून ठरवून दिलेल्या अधिकृत उपहारगृहावर एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांसोबतच एसटी महामंडळाची फसवणूक होत असल्याचा आरोप अहमदनगरच्या (Ahmednagar) अमर कळमकर यांनी केला आहे. अमर कळमकर आणि त्यांचे सहकारी आशिष सुसरे यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली होती. ज्यात अहमदनगर ते औरंगाबाद, अहमदनगर ते सोलापूर आणि अहमदनगर ते बीड अशा महामार्गावर नेमकी कोणत्या हॉटेल चालकांना अधिकृत थांबा देण्यात आला आहे याची माहिती मागवली, तर यात अनेक हॉटेलला असा थांबा दिला नसल्याची माहिती त्यांना मिळाली. मात्र, सध्या या हॉटेलवर सर्रासपणे एसटी महामंडळाच्या बस थांबत असल्याचं दिसून आलं आहे.

थांब्यावर जास्तीच्या दराने पैसे आकारले जातात

नगर औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल धनश्री येथे अधिकृत थांबा नसताना या हॉटेलच्या बाहेर तसा बोर्ड लावण्यात आला असून त्या हॉटेलवर बसेस आजही थांबतात. नियमानुसार अधिकृत बस थांब्यावर बस केवळ 15 मिनिटे थांबते, मात्र, बस थांब्यावर तासभर बस थांबत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच त्यांच्याकडून अशा थांब्यावर जास्तीच्या दराने पैसे आकारले जातात असा आरोप कळमकर यांनी केला आहे.

अधिनियम काय सांगतो ?
- रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हॉटेलवर गाडी थांबू शकत नाही.
-प्रवास सुरू केल्यानंतर कमीत कमी 50 किमी प्रवासानंतर किंवा दीड तास प्रवानंतरच गाडी अधिकृत थांबा ठिकाणी थांबवता येईन.
-हॉटेलच्या ठिकाणी 15 मिनिटे थांबा
-महामंडळ व्यतिरिक्त अनधिकृत हॉटेलवर गाडी थांबल्यास चालक - वाहक यांस प्रत्येकी 500 रुपये दंड
-महिन्यातून एकदा खाद्यान्न परीक्षण केले जाईल.

परवाना धारक हॉटेलचे कर्तव्य
-स्वच्छ , निःशुल्क पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
-स्वच्छ, निःशुल्क,स्वतंत्र स्वच्छतागृहे
-30 /- रुपयांमध्ये चहा- नाश्ता पुरवणे
-संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रणाखाली ठेवावा.
-प्रवाशांच्या सामानाची जबाबदारी हॉटेल आस्थापनेची राहील.

महिला प्रवाशांना त्रास होत असल्याची तक्रार
धक्कादायक म्हणजे नगर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल धनश्री या हॉटेलचे फूड अँड ड्रॅगच्या परवान्याची मुदत संपली आहे अशी माहिती कळमकर यांना मिळाली आहे. तरी देखील या हॉटेलवर बस थांबत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. तर नगर- औरंगाबाद रस्त्यावर ज्या हॉटेल हिराईला अधिकृत थांबा देण्यात आला आहे. तिथे बाजूलाच एक पान स्टॉल आहे जिथे अनेक प्रवाशी धूम्रपान करताना दिसतात. याचाही महिला प्रवाशांना त्रास होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे..

अनधिकृत बस थांबे सुरू
अधिकृत बस थांब्याबाबत महामंडळाकडून निविदा काढल्या जातात, त्यातून महामंडळाला उत्पन्न मिळते मात्र, महामंडळातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक ठिकाणी अनधिकृत बस थांबे सुरू असून त्यातून शासनाचा महसूल बुडतो, शिवाय अशा हॉटेलमध्ये प्रवाशांकडून अवाजवी बिल आकारली जातात. त्यामुळे प्रवाशांची देखील लूट होत असल्याचं कळमकर यांनी म्हंटलं आहे...यात अधिकाऱ्यांचे हॉटेल मालकांसोबत आर्थिक हितसंबध असल्याचा आरोप कळमकर यांनी केलाय. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचा इशारा अमर कळमकर यांनी दिला आहे.

from maharashtra https://ift.tt/6bN9wY5
ST News : राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनच महामंडळाची फसवणूक? अनधिकृत बस थांबे सुरू
July 18, 2022
0
Tags