Maharashtra Rains Live Updates : आठवडाभर राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. साताऱ्यासह सांगली आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं विश्रांती घेतली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.

साताऱ्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा मोठा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालं आहे. वाई कवठेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं होतं. या भागातील कवठे गावच्या हद्दीतील महामार्गावरील सर्विस रोडवर पाणी साठले होतं. हे पाणी सर्विस रोडवर शेजारी असलेल्या काही घरांमध्ये देखील शिरले. तसेच पावसाचं पाणी काही दुकानांमध्येही शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर काही घरात पाणी शिरल्याने लोकं पाण्यात अडकली होती. दरम्यान, सध्या पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. त्यामुळं पाणी ओसरलं आहे.

विश्रांतीनंतर काल हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील अनेक लहान मोठे ओढे भरुन वाहत आहेत. तर पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांच्या पाणी पातळीसुद्धा मोठी वाढ होताना दिसत आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना सुद्धा नवचैतन्य मिळत आहे. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

कोकणातही पावसाची दडी

कोकणातही पावसानं दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसापासून कोकणात पावसानं विश्रांती घेतली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या आठ दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. श्रावण सारख्या नयनरम्य महिन्याला सुरुवात झाली आहे. शिवाय सृष्टीही हिरव्या शालूत खुलून दिसत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोसळणाऱ्या पावसाच्या सरी गेल्या आठवड्यापासून कमी बरसू लागल्या आहेत.

जुलै महिन्यात चांगला पाऊस

जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.

from maharashtra https://ift.tt/4OBie2N
Maharashtra Rains Live Updates : राज्यात पावसानं घेतली विश्रांती, जुलै महिन्यात चांगला पाऊस
July 29, 2022
0
Tags