Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यात एक वेगळा अंक पाहायला मिळाला. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या राजीनाम्यानंतर राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले. महत्त्वाचं म्हणजे, हे मुख्यमंत्रीही शिवसेनेचेच. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाला. विशेष म्हणजे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात नवं सरकार स्थापन झालं.

नव्या सरकारनं पहिल्याच दिवशी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं अलर्टही जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत पाऊस परिस्थिती आणि दरडप्रवण क्षेत्राचा आढाव घेण्यात आला. शिवाय सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बैठक घेतली आणि दोषविरहित अहवालासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये दिसले.

शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळालं. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आता शिंदे गटाची भूमिका काय? असा प्रश्न होताच, पण काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे या नाट्याला वेगळं वळण मिळालं.

महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. आज या सत्तासंघर्षाचा दहावा दिवस. विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. आधी समर्थक आमदारांसह शिंदे 21 तारखेला सुरतला पोहोचले. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं एकनाथ शिंदेंच्या वतींन सांगण्यात आलं. यासर्व प्रकारात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदेंसोबतच्या काही आमदारांनी आपल्याला दमदाटी करुन, धमक्या देऊन सूरतमध्ये नेल्याचं सांगितलं. काहींनी मातोश्रीवर निरोप धाडले तर काहींनी एकनाथ शिंदेंच्या हातावर तुरी देत चक्क मुंबई गाठली. यासर्व घडामोडींमध्ये तो दिवस मावळला. पण घडामोडी काही थांबल्या नाहीत.

शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आणि संबंध महाराष्ट्र हादरला. सूरतमध्ये आपल्या आमदारांसह एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर शिवसेनेकडून मन वळवण्याचा प्रयत्न सुरु झाला. पण एकनाथ शिंदेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सूरतमधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सगळे आमदार गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले. मग तिथून ते हे सगळे आमदार आसाममधल्या गुवाहाटीत पोहोचले. आता या सर्व आमदारांचा मुक्काम गोव्यात आहे.

22 जून 2022

एकनाथ शिंदेंचं बंड तीव्र...

शिंदेंसोबतचे सर्व आमदार सुरतमधून गुवाहाटीला निघण्याच्या तयारीत...

कार आणि बसमधून शिंदे समर्थक आमदार विमानतळाकडे रवाना...

शिवसेना आमदारांनी कोणतही बंड केलेलं नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

गुवाहाटीला रवाना होण्यासाठी शिंदेंसह समर्थक आमदार सुरत विमानतळावर दाखल

शिदेंसोबत शिवसेनेचे 33 तर इतर दोन आमदार

एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल

विमानतळावरुन सर्व आमदार गुवाहाटीच्या ब्ल्यू रेडिसन हॉटेलमध्ये

शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडू शिंदेंसोबत गुवाहाटीत

गुवाहाटीमध्ये पोहचताच एकनाथ शिंदे पुन्हा कॅमेऱ्यासमोर

आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदेंचं शिवसेनेला आव्हान

एकनाथ शिंदेंना जवळपास 50 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं बच्चू कडूंचं वक्तव्य, बच्चू कडू शिंदेंसह गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती

ठाण्यातले 5 आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या सोबत ठाण्यात आणखीन काही नगरसेवक स्टँड बाय मोड वर असल्याचीही माहिती

देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक... शरद पवार सिल्व्हर ओकवरील बैठक आटोपून वाय. बी. चव्हाण सेंटरला

महाराष्ट्रातील राजकीय पेचावर खासदार संजय राऊतांचं ट्विट, 'राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा, बरखास्तीच्या दिशेनं', असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे एकप्रकारे राऊतांकडून संकेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या कार्यालयात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह... मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थिती

दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य, शिवसेना आणि भाजपनं एकत्र राहायला हवं असं केसरकर म्हणाले.

"मला उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं" शिवसेनेतील बंडावर संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नारायण राणे दाखल

शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले शिदेंकडून सुनील प्रभूंची प्रतोद पदावरुन उचलबांगडी

राज्यात राजकीय घडामोडींना वेग अपक्ष आमदार गीता जैन आणि बविआचे क्षितीज ठाकूर फडणवीसांच्या भेटीला तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे... उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. "मी राजीनामा तयार करुन ठेवलाय, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा" उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना समोर येण्याचं आव्हान

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्वीट, "होय, संघर्ष करणार" राऊतांचा ट्विटमधून विरोधकांना टोला

गुवाहाटीला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परत आले. त्यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला मारहाण झाल्याचं आणि जबरदस्ती नेल्याचं सांगत हे सगळं भाजपचं षडयंत्र असल्याचा दावा केला.

23 जून 2022

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष : सूत्र

शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली, मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरु झालं

कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा; सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल झालं

राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं

गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन केलं

आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत राऊतांनी सांगितलं. शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा केला

'ही आहे आमदारांची भावना'; एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट केलं. हे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं ज्यात बडव्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रार होती

पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं

एक दिवस आधी एकनाथ शिंदेंविरुद्ध आंदोलन करणारे सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार शिंदे गटात गेले, यानंतर सदा सरवणकर गद्दार म्हणत शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर आला

कृषीमंत्री दादा भुसेही एकनाथ शिंदे गटात जाऊन पोहोचले

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले

शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही"

सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो जारी करत दिला पुरावा

नाना पटोले म्हणाले...अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे, निधी देत नसत

एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही?, शरद पवार गृहखात्यावर नाराज

का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण

आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला

बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!

भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, तर शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही, बंडखोरांना इकडे यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले

एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी नार्वेकरांसोबत सूरतला गेलेले फाटकही शिंदेंच्या गटात, गुवाहाटीत दाखल

बंडखोरांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल; नारायण राणेंची थेट शरद पवारांना धमकी

12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी केली तर आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, खरी शिवसेना आमचीच; कारवाईसंबंधी शिवसेनेच्या पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा इशारा

जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश

24 जून 2022

बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा पूर्ण झाला आहे. मात्र अद्याप सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली

एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही : चंद्रकांत पाटील

अजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं

शिवसेनेकडून शिंदे गटातील आणखी चार आमदारांच्या अपात्रतेची मागणी; एकूण 16 आमदार लिस्टमध्ये...

आपल्यासोबत कोणी नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा; उद्धव ठाकरे यांचं आवाहन, उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान... हीच वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार

नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा; अपक्ष आमदारांचे पत्र

शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक, दोन तासांनी संपली बैठक

बंड करण्यासाठी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, आता आपण लढायचं आणि जिंकायचं, आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

तुम्ही निवडून आलेल्यांना फोडून दाखवाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे आणि भाजपला आव्हान

25 जून 2022

'भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय', सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल, एकनाथ शिंदेंना बाबा 'योगराज'ची उपमा; गुवाहाटीत योग शिबिरातील आमदारांना अन्नातून अफू गांजा दिला जातो काय असाही आरोप

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली; चर्चेसाठी शिष्टमंडळ स्थापन करणार असल्याची माहिती समोर

शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय, आमदार संजय शिरसाट यांचा आरोप

शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना अ‍ॅक्शन मोडमध्ये; आदित्य ठाकरेंचे मुंबईत मेळावे घेण्याचं जाहीर

शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, संजय राऊतांचं माध्यमांशी बोलताना वक्तव्य

एकनाथ शिंदे यांचा नवा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांचे संरक्षण काढले तर गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले

बंडखोर आमदार तानाजी सावंतांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक आक्रमक, सावंत यांच्यासह काही बंडखोर आमदार, खासदारांची कार्यालयं फोडली, ठाण्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदेंचंही कार्यालय फोडलं, नाशिकमध्येही शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला काळे फासले, शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागरांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक, घरावर हल्लाबोल मोर्चा
शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समोर आली

आमदारांप्रमाणे शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदार बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांचा दावा

स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात; विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली नोटीस

पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच; एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण

एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तीप्रदर्शन, श्रीकांत शिंदेही उपस्थित

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मनातील मुख्यमंत्री ते बंडखोरांची मंत्रीपदं 24 तासांत जाणार, संजय राऊत यांचं माझा कट्ट्यावर रोखठोक भाष्य

विकिपीडियावर एकनाथ शिंदेंच्या नावाचा डंका; बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

'मविआ'चा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय; एकनाथ शिंदेंचं नवं ट्वीट

'जे गेले ते गेले... आमचे नवे उमेदवार जिंकण्यासाठी सज्ज आहेत', आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

शिवसेनेत राजीनामा नाराजीनाट्याला सुरुवात, ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा

एकनाथ शिंदे समर्थकांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग वाढवलं

26 जून 2022

'आना ही पडेगा, चौपाटी में'; नरहरी झिरवाळांचा भन्नाट फोटो टाकत संजय राऊतांचं खोचक ट्वीट

शिवसेनेत बंड: 'सिल्वर ओक'वर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबतं

'फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या'; संजय राऊतांचा 'रोखठोक' हल्लाबोल

हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरं जा, संजय राऊतांचं माध्यमांशी बोलताना चॅलेंज

बंडखोर आमदारांच्या घरांना आता केंद्राची सुरक्षा, आमदारांच्या घराबाहेर CRPFचे जवान तैनात

आमची भिकाऱ्यासारखी परिस्थिती झाली होती; उद्धव ठाकरेंबद्दल सत्तार यांची नाराजी

दहिसरमधील सभेत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. संजय राऊत थेटच बोलले, 'प्रताप सरनाईकांनी सांगितलं फडवणीस मला अमित शाहांकडे घेऊन गेले अन् माझं ईडीचं मॅटर साफ झालं', संजय राऊत यांचे बंडखोरांना आव्हान, एका बापाचे असाल तर आमदारकीचे राजीनामे द्यावे

मुख्यमंत्री पदाबाबत विचारल्यानंतरही शिंदेंचं बंड, बंडखोरांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

राज्यपाल कोश्यारींना रुग्णालयातून डिस्चार्ज, कोरोनातून बरे झाल्यावर राजभवनावर पोहोचले

मंत्री उदय सामंतही नॉट रिचेबल, एकनाथ शिंदे गटात सामिल

ठाकरे नाव न लावता मैदानात या, मग तुम्हाला तुमची किंमत कळेल; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिंदे गटाकडून 50 कोटींहून अधिकची ऑफर, आमदार उदयसिंग राजपूत यांचा दावा

शिवसेनेच्या बंडखोर गटावर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करणे शक्य असल्याचे शिवसेनेने म्हटले. बंडखोरांना आपला गट एखाद्या पक्षात विलीन करावाच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील माफिया सरकारचा अंत जवळ आला, किरीट सोमय्यांची टीका

ठाकरे सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा : शरद पवार

'महाराष्ट्रातील मविआ सरकार आणखी दोन-तीन दिवस चालणार', केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंचा इशारा

शिंदे गटाकडून पर्यायांची चाचपणी सुरू, विलीन करण्याची वेळ आल्यास मनसेचाही पर्याय?

महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ सुप्रीम कोर्टात, अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गटाकडून याचिका. शिंदेंच्या बाजूने लढणार हरीश साळवे, तर ठाकरे सरकारकडून कपिल सिब्बल मैदानात

आमचे नेते उद्धव ठाकरेच, उर्वरीत 14 जणांनी आमच्यासोबत यावे : दीपक केसरकर

कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाहीत: एकनाथ खडसे

बंडखोर आमदारांच्या मतदार संघात हायअलर्ट; मुंबई, एमएमआरडीए भागात विशेष खबरदारीच्या सूचना

दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांचं सेना समर्थन कशी करू शकते? संजय राऊतांच्या विधानावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

27 जून 2022

सुप्रीम कोर्टानं बंडखोर आमदारांना 11 जुलैपर्यंत दिलासा दिल्यानं आता सत्तासंघर्षाचा पुढचा अंक राजभवनात दिसणार आहे. कोर्टानं 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला संरक्षण दिल्यानं आता शिंदे गटात हालचाली सुरु झाल्यात. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या आदेशात विश्वासदर्शक ठरावाववर कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता विश्वासदर्शक ठरावाचा पर्याय खुला झालाय.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. भाजपच्या आजच्या बैठकीत अविश्वास ठरावाबाबत चर्चा झाली. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गुवाहाटी ते भाजपच्या बैठकीत खलबतं सुरु आहेत. त्यामुळे आता ही लढाई राजभवनाकडे कूच करतेय.

'बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढल्याचं पत्र मिळालं नाही', याचिकेत पाठिंबा काढल्याच्या उल्लेखावर राजभवनाचं स्पष्टीकरण

ठाकरेंकडून याआधीच दोन वेळा राजीनामा देण्याची तयारी होती. 21 आणि 22 रोजी मुख्यमंत्री राजीनामा देणार होते. तर पवारांनी ठाकरेंना राजीनामा देण्यापासून रोखलं, सूत्रांची माहिती

सत्तासंघर्षाचा पुढचा अंक राजभवनाच्या दारात दिसणार. पाठिंबा काढल्याचं पत्र शिंदे गट राजभवनाला पाठवणार. पत्रानंतर ठाकरेंना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागणार

राज्यातील अस्थिर स्थितीवर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटलंय.

28 जून 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार वाचवण्यासाठी दोन वेळा फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे-फडणवीस यांच्यात 21 जून रोजी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचं जे कारस्थान सहयोगी पक्षांकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटीला आलो, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं

शिवसेनेचे बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगावीत असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले.

भाजप आणि शिंदे गटामध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या पडद्याआडून हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, संभ्रम दूर करा, परत या, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला भावनिक आवाहन

फ्लोअर टेस्ट घ्या बहुमत सिद्ध करु: दीपक केसरकर

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शिवसैनिकांनो, परत फिरा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आवाहन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं आहे. हे आवाहन फेटाळताना त्यांनी मुख्यमंत्री तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली

गुवाहाटीत शिंदे गटाची महत्त्वाची बैठक, पुढची भूमिका ठरवण्यावर चर्चा झाल्याची शक्यता

मविआने बहुमत सिद्ध करावं, भाजपचं राज्यपालांना पत्र, राज्यपालांच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष

तारीख आणि वेळ ठरल्यानंतर शिंदे गट मुंबईला येणार

राज्यातल्या राजकारणात भाजपने एन्ट्री घेतल्यानंतर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर तिकडे गुवाहाटीमध्येही एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्यानंतर, त्याची तारीख आणि वेळ ठरल्यानंतर बंडखोर आमदार मुंबईला येणार आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा सगळा गेम आता राज्यपालांच्या हाती आल्याचं चित्र आहे.

29 जून 2022

कालचा बंडाचा नववा दिवस होता. कालचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल तो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे. उद्धव ठाकरेंनी काल (बुधवारी) मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आणि राजकीय नाट्याला वेगळं वळणं मिळालं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच, राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

राज्यपालांनी आज (गुरुवारी) बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली.

बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडे याचिका सुनावणीसाठी वर्ग करण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं संध्याकाळी 5 वाजता याचिका सुनावणीसाठी वर्ग करण्यात आली.

दुसरीकडे राजकीय सत्तासंघर्षात बंडखोर नेत्यांच्या एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत होत्या. गुवाहाटीत असलेल्या सर्व आमदारांनी कामाखअया देवीचं दर्शन घेतलं आणि बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं.

बहुमत चाचणीसाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्या. सर्व बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्यात आणण्यात आलं.

महाविकास आघाडी सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करत संभाजीनगर आणि धाराशीव करण्यात आलं. तसेच, नवी मुंबईतील विमानतळाला दी. बा. पाटलांचं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या वतीनं घेण्यात आला.

संध्याकाळी 5 वाजता अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवत रात्री 9 वाजता जाहीर करण्याचं सांगितलं. महाविकास आघाडी सरकारचं संपूर्ण लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलेलं. त्यानंतर पुढची भूमिका घेणार असल्याच आधीच मविआ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं.

बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला, हा महाविकास आघाडी सरकारला सर्वात मोठा धक्का होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं.

मुख्यमंत्र्यांनी रात्री 9.30 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे भाजच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

उद्धव ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत राजभवनात जात राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

30 जून 2022

महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात झाली असून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काल राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील सत्तासंघर्षात नवा अंक पाहायला मिळाला.

काल (गुरुवारी) सकाळपासूनच राज्यात राजकीय घडामोडींना वेग मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबई गाठली आणि गेली अनेक दिवस गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी उघड झाल्या. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यापासून एकनाथ शिंदे गट पुढचं पाऊल काय उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली.

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात एक नवा अंक पाहायला मिळाला. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी झाला आणि महाराष्ट्राला नवं सरकार मिळालं. पण यात सरकारबाहेर राहून जबाबदारी स्वीकारणारं असं सांगणारे फडणवीस अचानक पिक्चरमध्ये आले. आणि थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातीवाटप होणार आहे.

विधानसभेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून नव्या सरकारची बहुमत चाचणीसह विधानसभा अध्यक्षांचीही निवड होणार आहे.

01 जुलै 2022

नव्या सरकारची बहुमत चाचणी एक दिवसाने पुढे ढकलण्यात आली. राज्यापालांनी विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली असून आता अधिवेशन 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे.

2024 च्या निवडणुकांसाठी कामाला लागा, अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी भाजप आमदारांना केल्या आहेत. हे सरकार आपलं, नाराज होऊ नका, सर्वांनी जनतेसाठी काम करा असंही फडणवीस म्हणालेत. भाजप आमदारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीसांनी आमदारांशी संवाद साधला.

राज्यात गेले दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षात काल अभूतपूर्व ट्विस्ट आला. आणि त्यानंतर सर्वांच्या अपेक्षांना छेद देत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. राज्यातल्या या सत्तांतरानंतर आज मुंबईत भाजपनं जल्लोष साजरा केला. फडणवीस मात्र या जल्लोषात सहभागी झाले नाहीत. भाजपच्या विजयी जल्लोषाकडे अनेक ज्येष्ठ नेत्यांची पाठ फिरवली.

आता मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा अध्यांक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावार शिक्कामोर्तब झालेय. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहाता राहुल नार्वेकर पुढील विधानसभा अध्यक्ष होणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करायचा होता म्हणून केंद्रातल्या नेतृत्वानं त्यांना उपमुख्यमंत्री केलं. अशा शब्दात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावरुन फडणवीसांवर अनेकांनी निशाणा साधलाय. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारं पत्र पाठवलंय. या पत्रात देवेंद्र फडवणीस यांचं त्यांनी अभिनंदन केलेय. त्याशिवाय पक्षाच्या निर्णायासाठी घेतलला निर्णय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितलंय.

शिवसेना नेते संजय राऊत यांची दहा तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ही चौकशी झालीय. दरम्यान चौकशीत सहकार्य केल्याचं राऊतांनी सांगितलंय. पुन्हा चौकशीला बोलावल्यास सहकार्य करणार असल्याचं राऊत म्हणालेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तांतरानंतर काल (शुक्रवारी) प्रथमच मीडियासमोर निवेदन केलं. भाजपनं मुख्यमंत्रिपदी बसवलेला शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिवसेनेशिवाय शिवसेेनेचा मुख्यमंत्री असूच शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर भाजपचा अडीच वर्षे शानदारपणे मुख्यमंत्री झाला असता, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईत आरे कारशेडचा प्रकल्प पुन्हा पुढे रेटू नका, माझा राग मुंबईवर काढू नका, असं ठाकरे यांनी सांगितलं.

नव्या सरकारनं पहिल्याच दिवशी बैठकांचा धडाका सुरु केला आहे. मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं अलर्टही जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत पाऊस परिस्थिती आणि दरडप्रवण क्षेत्राचा आढाव घेण्यात आला. शिवाय सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात बैठक घेतली आणि दोषविरहित अहवालासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये दिसले.

from maharashtra https://ift.tt/21yPOEZ
Maharashtra Politics Timeline : नव्या सरकारचा बैठकींचा धडाका, पावसाळा-ओबीसी आरक्षणावर खलबतं; राजकीय घडामोडींची टाईमलाईन एका क्लिकवर
July 01, 2022
0
Tags