4th october In History : आजचा दिवस मानवासाठी अतिशय खास आहे. अंतराळ विज्ञानाच्यादृष्टीने आज महत्त्वाचे पाऊल मानवाने टाकले. सोव्हिएत रशियाने जगातील पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. तर, मराठी रंगभूमीवर अभिनेते गायक अरुण सरनाईक यांचा आज जन्मदिन आहे.

जागतिक अंतराळ सप्ताह

वर्ल्ड स्पेस वीक ( WSW ) हा जगभरातील 95 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये 4 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यात येतो. वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन (WSWA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (UN)यांच्या समन्वयाने दरवर्षी जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन केले जाते. 6 डिसेंबर 1999 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक अंतराळ सप्ताह हा वार्षिक कार्यक्रम म्हणून 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार असल्याचे घोषित केले. या सप्ताहाची तारीख अंतराळाशी संबंधित महत्त्वाच्या घटनांवर आधारीत आहे. 4 ऑक्टोबर रोजी पहिला कृत्रिम उपग्रह सोडण्यात आला. तर, 10 ऑक्टोबर रोजी बाह्य अवकाश करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

1921 : गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन

मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध संगीत गायक, नट केशवराव भोसले यांचा आज स्मृतीदिन

1902 मध्ये शारदा नाटकात शारदेची भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली. ही त्यांची भूमिका चांगलीच गाजली. यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले., त्यानंतर 1907 साली त्यांनी ही 'नाटक मंडळी' सोडली आणि 1 जानेवारी 1908 रोजी हुबळी येथे ‘ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ ही स्वतःच्या मालकीची नाट्यसंख्या स्थापन केली. नाटकाची निवड करताना केशवराव भोसले यांनी लोकशिक्षणाचाच हेतू कटाक्षाने डोळ्यापुढे ठेवला. संगीत नाटकांत त्यांनी गायलेल्या गीतांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली. टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. कालांतराने त्यांनी स्त्रीभूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या.

1935: मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते, गायक अरुण सरनाईक यांचा जन्म

मराठी चित्रपटजगत आणि रंगभूमीवर आपली छाप सोडणारे अभिनेते, गायक, तबलावादक अरुण सरनाईक यांचा आज जन्मदिन. 1961 सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील एका भूमिकेतून अरुण सरनाईक यांनी चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले. अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. त्यामुळे गाण्याचे हे अंग अरुण सरनाईक यांना या जोडीकडूनच मिळालं होते. 21 जून 1984 रोजी एका दैनिकाच्या टॅक्सीतून ते पुण्याहून कोल्हापूरला जात होते. त्या टॅक्सीला कोल्हापूरजवळ अपघात होऊन अरुण सरनाईक यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 49 वर्ष होते.

1957 : सोविएत रशियाने स्पुटनिक-1 हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला

अंतराळ संशोधनाच्यादृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी मानवाचे अंतराळयुग सुरू झाले. चार ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुतनिक-1 अवकाशात सोडला. गोल आकाराचा हा उपग्रह जवळपास 83 किलोग्रॅम वजनाचा होता. या उपग्रहास पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 98 मिनिटे लागत. या उपग्रहात चार अँटिना व दोन रेडीओ ट्रान्समीटर होते. सेरगई कोरोलयोव्ह हे स्पुतनिकचे चीफ डिझायनर होते.

अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीतयुद्धाच्या काळात रशियाने अमेरिकेवर कुरघोडी करत पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळ सोडला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अंतराळ क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली.

इतर घटना

1824: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.
1884: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म.
1904: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन.
1943: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.
1966: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
1989: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन

from maharashtra https://ift.tt/QnKYq5M
4th October In History: अभिनेते अरुण सरनाईक यांचा जन्म, मानवाने पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला; आज इतिहासात...
October 03, 2023
0
Tags