मुंबई: आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता. तसेच आजच्याच दिवशी मद्रासच्या पेरांबूरमध्ये रेल्वेचा पहिला कोच तयार करण्यात आला. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,

1869 : महात्मा गांधींचा जन्म

आजच्याच दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म (Mahatma Gandhi Birth Anniversary) झाला होता. वकिली करायला आफ्रिकेत गेलेल्या गांधींचं जीवन एका घटनेनं बदललं. 7 जून 1893 गांधीजी डरबनहून प्रिटोरीयाला (Mahatma Gandhi At South Africa Pretoria) जात असताना एका गोऱ्या अधिकाऱ्याने त्यांना प्रथम श्रेणीच्या बोगीतून फेकून दिलं आणि त्यानंतर गांधीजींनी वर्णभेदाविरोधात लढा उभा केला. भारतातही त्यांनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांच्या विरोधात लढा सुरू केला. 1919 सालचे असहकार आंदोलन, 1930 सालचं सविनय कायदेभंग आणि 1942 सालचे चले जाव आंदोलन हे त्यांनी उभारलेल्या आंदोलनातील सर्वात मोठी आंदोलनं. त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आणि भारताला सविनय मार्गाने स्वातंत्र्य मिळालं.

1904- लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म

लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri Jayanti) यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान गावात झाला. 1930 मध्ये, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा केली आणि मिठाचा कायदा मोडला. या प्रतिकात्मक संदेशाने संपूर्ण देशात क्रांती आली. लाल बहादूर शास्त्री पेटून उठले आणि स्वातंत्र्य लढयात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. त्यांनी अनेक विद्रोही मोहिमांचे नेतृत्व केले आणि एकूण सात वर्षे ब्रिटीश तुरुंगवासात घालवली.

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1951 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उदयोग मंत्री, गृहमंत्री आणि नेहरुंच्या आजारपणात बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1964 साली नेहरूंच्या मृत्यूनंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. लाल बहादूर शास्त्री आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. 1965 च्या युद्धात त्यांनी 'जय जवान, जय किसान'चा नारा दिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला या युद्धात चारीमुंड्या चित केलं.

1952- समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात

सामुदाय विकास कार्यक्रमाची (Community Development Programme) सुरुवात 2 ऑक्टोंबर 1952 रोजी करण्यात आली. या माध्यमातून भारताच्या ग्रामीण जीवनाचा सर्वागीण विकास करणे आणि त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवणे हा होता. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा समजण्यात आला.

1955- मद्रासच्या पेरांबूरमध्ये रेल्वेचा पहिला कोच तयार

मद्रासच्या पेरांबूर या ठिकाणच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये देशातील रेल्वेचा पहिला डबा निर्मित करण्यात आला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात अनेक अवजड उद्योग सुरु करण्यात आले. त्यामध्ये पेरांबूर या ठिकाणी रेल्वेचे कोच तयार करण्याचा कारखाना सुरु करण्यात आला होता. भारताच्या औद्योगिक विकासाची ही सुरुवात समजली जाते.

1986- हुंडाबंदी कायद्यात सुधारणा

भारतात सर्वप्रथम 1961 साली हुंडाबंदी कायदा लागू करण्यात आला. 2 ऑक्टोबर 1986 रोजी त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या कायद्यान्वये हुंडा देणे किंवा हुंडा घेण्यास बंदी आहे. लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतरही हुंडा घेणं कायद्यान्वये बंदी घालण्यात आली.

2001- नाटोने अफगाणिस्तानवरील हल्ल्याला मंजुरी दिली

अमेरिकेत 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तीन हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं. त्याचाच एक भाग म्हणून या घटनेचा सूत्रधार ओसामा बिन लादेनला (Osama bin Laden) अमेरिकेने संपवण्याचा विडा उचलला. ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये लपून बसला असल्याची माहिती होती. त्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची योजना तयार केली. अमेरिकेच्या या योजनेला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटोने 2 ऑक्टोबर 2001 रोजी मान्यता दिली.

2014- स्वच्छ भारत योजनेला सुरुवात

महात्मा गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात स्वच्छतेला दिलेलं महत्व लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींच्या जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2014 रोजी देशात स्वच्छ भारत योजनेची (Swachh Bharat Mission) सुरुवात केली. महात्मा गांधी स्वच्छ भारत मिशन असं या योजनेला नाव देण्यात आलं. 2022 पर्यंत भारतातील सर्व शहरं आणि गावं ही स्वच्छ करणे हा उद्देश या मागे होता. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक घरामध्ये टॉयलेटची सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता करण्यात आली.

from maharashtra https://ift.tt/kLlq5wN
2nd october In History : भारताचे दोन महान रत्ने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्म, देशात स्वच्छ भारत योजनेला सुरूवात; आज इतिहास
October 01, 2023
0
Tags