मुंबई : इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवसात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात. आजच्याच दिवशी सदाबहार गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही भारतीयांच्या हृदयावर राज्य करतो. त्यांचा अप्रतिम आवाज अनेकांच्या मनाची तार छेडतो.याच किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झालं होतं. तर प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची पायाभरणी झाली होती. मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते.

1792 : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची पायाभरणी

अमेरिकेचे शक्तिस्थान आणि ओळख असणाऱ्या व्हाईट हाऊसची (White House) 13 ऑक्टोबर 1792 रोजी पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे आठ वर्षानंतर, म्हणजे नोव्हेंबर 1800 मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झालं. व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असून त्यांचे कार्यालयही त्याच ठिकाणी आहे.

1877: होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म

भुलाभाई देसाई यांचा जन्म गुजरातमधील वलसाड येथे झाला . गुजरातमधून त्यांनी 1895 साली मॅट्रीकची परीक्षा पास केली.त्यांचे शाळेत असतानाच त्यांनी इच्छाबेनशी लग्न केले.परंतु इच्छाबेन यांचे 1923 मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तेथून त्यांनी इंग्रजी साहित्य आणि इतिहासात उच्च पदावर पदवी प्राप्त केली. भुलाभाई यांची अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये इंग्रजी आणि इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अध्यापन करताना त्यांनी कायद्याचेही शिक्षण घेतले.

भुलाभाईंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अॅनी बेझंटच्या ऑल इंडिया होम रूल लीगमध्ये सहभागी होण्यापासून केली. ब्रिटीश प्रभावांना पाठिंबा देणार्‍या भारतीय उदारमतवादी पक्षात ते सामील झाले होते. 1928 च्या बारडोली सत्याग्रहानंतर ब्रिटीश सरकारच्या चौकशीत त्यांनी गुजरातच्या शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व केल्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी त्यांचा संबंध सुरू झाला. सत्याग्रह ही गुजरातच्या शेतकर्‍यांनी दुष्काळाच्या काळात जाचक कर धोरणाचा निषेध करणारी मोहीम होती. भुलाभाईंनी शेतकर्‍यांच्या केसचे जोरदारपणे प्रतिनिधित्व केले आणि संघर्षाच्या अंतिम यशासाठी ते महत्त्वाचे होते.

1911 : मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचे निधन

स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांचे 13 ऑक्टोबर 1911 रोजी निधन झालं. त्यावेळी त्या अवघ्या 43 वर्षांच्या होत्या. स्वामी विवेकानंद यांनी त्यांना भगिनी निवेदिता (Sister Nivedita) हे नाव दिलं. भगिनी निवेदिता यांनी आयुष्यभर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार केला.

1911: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म

बॉलिवूडचा पहिला 'अँटी हीरो' म्हणूनही अशोक कुमार ओळखले जाते.'दादामुनी' या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते अशोक कुमार यांचा 13 ऑक्टोबर 1911 रोजी जन्म झाला. कुमुदलाल गांगुली असं त्यांचं नाव होतं.अशोक कुमार यांनी देविका राणी ते मीना कुमारीपर्यंत त्याकाळातील अनेक नायिकांसोबत काम केलं आहे. अशोक कुमार यांनी सिनेमांसह मालिकेतदेखील काम केलं आहे. 1943 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'किस्मत' या सिनेमात ते पहिल्यांदा अँटी हीरो'च्या भूमिकेत दिसले होते. अशोक कुमार यांनी 2001 साली वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनयासोबत ते एक उत्तम गायक आणि चित्रकारदेखील होते.अशोक कुमार यांनी होमिओपॅथीची पदवी घेतली होती. अशोक कुमार यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 'जीवन नया' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

1948 : सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म

नुसरत फतेह अली खान हे प्रसिद्ध सुफी कव्वाल होते. त्यांनी आध्यात्मिक अंग लाभलेल्या कव्वाली या गायकीच्या परंपरेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांचे घराणे कव्वाल गायकी जिवंत ठेवणारे 600 वर्षांचे जुने घराणे आहे. नुसरत फतेह अली खान यांना शहेनशाह-ई-कव्वाल या नावाने ओळखले जाते.1995 साली युनेस्को संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक जागतिक संगीत तज्ज्ञ हे नुसरत यांच्या गायकीचे चाहते होते. नुसरत फतेह अली खान यांचे घराणे पंजाबी मुस्लिम वंशीय आहे. त्यांचे वडील उस्ताद फतह अली खां हे स्वतः अत्यंत उत्तम दर्जाचे कव्वाल होते. नुसरत फतेह अली आपल्या गायकीच्या पेशात येऊ नये, असे वडिलांना वाटत होते, तथापि वडलांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या एका धार्मिक कार्यक्रमात नुसरत फतेह अली यांनी वडिलांना कव्वालीचीच श्रद्धांजली अर्पण करून आपल्या गायन कलेचा प्रारंभ केला.

1987 : सदाबहार गायक किशोर कुमार यांचे निधन

पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक या सिनेमातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपला अजरामर ठसा उमटवणाऱ्या किशोर कुमार यांचे आजच्याच दिवशी निधन झाले. बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये किशोर कुमार यांनी पार्श्वगायन केले आहे. किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार ही त्यांची भावंडे होते. किशोर कुमार हे सगळ्यात धाकटे होते.

आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकीर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (1946) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआए क्यों मांगू.. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या.

गाण्यात मन रमणाऱ्या किशोर कुमार यांना गायक व्हायचे होते. मात्र, वडील बंधू अशोककुमार यांच्या आदरयुक्त भीतीमुळे त्यांनी काही काळ चित्रपटांमध्ये अभिनय केला. किशोर कुमार यांच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये लडकी (1953), नौकरी (1954), बाप रे बाप (1955), पैसा हाय पैसा (1956), नई दिल्ली (1956), नया अंदाज, भागम भाग, भाई भाई (1956) , आशा (1957), चलती का नाम गाडी (1958), दिल्ली का ठग, जलसाझ, बॉम्बे का चोर, झुमरू, हाफ तिकीट, मिस्टर एक्स इन बॉम्बे पडोसन (1968) आदी चित्रपटांचा समावेश होतो.

किशोर कुमार यांनी संगीत शिकले नव्हते. ते के.एल. सैगल यांची नक्कल करत असे. संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली.

1968 मधील पडोसन चित्रपटात संगीतकार राहुल देव बर्मन यांनी किशोर कुमार यांना संधी दिली. किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

1969 मध्ये शक्ती सामंताने 'आराधना'ची निर्मिती व दिग्दर्शन केले. किशोर कुमार यांनी या चित्रपटात तीन गाणी गायली; "मेरे सपोनों की रानी", "कोरा कागज था ये मन मेरा" आणि "रूप तेरा मस्ताना". जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कुमारच्या तीन गाण्यांनी त्याला बॉलिवूडचा अग्रगण्य पार्श्वगायक म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर किशोर कुमार यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

1970 आणि 1980 च्या दशकापासून किशोर कुमार यांनी धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जीतेंद्र, संजीव कुमार, देव आनंद, शशी कपूर, मिथुन चक्रवर्ती, विनोद खन्ना, दिलीप कुमार, शम्मी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, आदित्य पंचोली, नसीरुद्दीन शाह, संजय दत्त, सनी देओल, अनिल कपूर, राकेश रोशन, प्राण, सचिन, विनोद मेहरा, रजनीकांत, चंकी पांडे, कुमार गौरव, संजय खान, फिरोज खान, कुणाल गोस्वामी, गोविंदा आणि जॅकी श्रॉफ अशा विविध अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केले. किशोर कुमार यांनी सर्वाधिक पार्श्वगायन राजेश खन्ना यांच्यासाठी केले होते. किशोर कुमार यांनी राजेश खन्नासाठी 245, जीतेंद्रसाठी 202, देव आनंदसाठी 119 आणि अमिताभसाठी 131 गाणी गायली आहेत.

किशोर कुमार यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा 8 वेळेस फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना 28 नामांकने मिळाली होती. त्या श्रेणीतील सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा आणि नामांकन मिळण्याचा विक्रम त्यांच्याकडे आहे. अशाच या सदाबाहार गायकाचं 13 ऑक्टोबर 1987 रोजी निधन झालं.

इतर महत्त्वाच्या घटना :

1929 : पुण्यातील पर्वती देवस्थान अस्पृश्यांसाठी खुले झाले.
1945 : द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन.
1999 : अटल बिहारी वाजपेयी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
2013 : मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.
2016 : अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्याचा नोबेल

from maharashtra https://ift.tt/tTmnQ0h
13 October In History : प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म, गायक किशोरकुमार यांचे निधन; आज इतिहासात
October 12, 2023
0
Tags