6th August In History: इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आज 9 ऑगस्ट, म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन आहे. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध 'भारत छोडो', 'चले जाव' आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवशी अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर दुसरा अणुबाँब टाकला होता. सिंगापूर देश आजच्या दिवशी स्वतंत्र झाला. या व्यतिरिक्त आजच्या दिवसाचं महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया.

जागतिक आदिवासी दिन (World Indigenous Day )

आजचा दिवस, म्हणजेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निरनिराळ्या खंडापर्यंत प्रवास करू लागला. तिकडच्या वातावरणाशी त्याने जुळवून घेतलं. हळूहळू शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली. परंतु आजही जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक आदिवासी जमाती आपली बोलीभाषा, रुढी परंपरा जपत निसर्गाच्या सान्निध्यात राहत आहेत, आधुनिक दुनियेच्या झगमगटापासून ते कोसो दूर आहेत. आधुनिक समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकल्यामुळे या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि इतर अनेक सोयी-सुविधांपासून ते वंचित राहिले आहेत. या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी जागतिक आदिवासी दिनाची घोषणा केली.

1942 : ऑगस्ट क्रांती दिन (August Kranti Din)

क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातला एक फार महत्वाचा दिवस आहे. 8 ऑगस्ट 1942 साली काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरु केलं. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन सुरू केलं होतं. गांधीनी देशाला 'करो या मरो'चं आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '9 ऑगस्ट' हा 'ऑगस्ट क्रांती दिवस' म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून, देशाच्या एकतेची भाषणं आणि इतर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधीनी मुंबईच्या गोवालिया टँक येथून भाषण दिल्याने या मैदानालाही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी आणि इतर नेते 8 आणि 9 आॉगस्ट 1942 रोजी गोवालिया मैदानात एकत्र जमले होते.या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या या मैदानावर स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.

सध्या या मैदानाचं रुपांतर पाच विभागणी असलेल्या मोठ्या मैदानात झालं आहे. एक विभाग हा शहीदांच्या स्मारकांचा आहे. सगळ्यात मोठ्या भागात खुल्या खेळाचं मैदान, त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि लहान मुलांसाठी छोटंसं खेळाचं मैदान आहे. गांधी ज्या मणीभवनाचा वापर मुख्यालय म्हणून करत होते त्यापासून जवळच हे मैदान आहे. हे मैदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तसेच एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग आहे, परंतु दुर्दैवाने इतिहासाची माहिती देणाऱ्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही.

1965 : सिंगापूर स्वातंत्र्य दिन

मलेशियातून बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे. 9 ऑगस्ट 1965 रोजी सिंगापूर मलेशियापासून वेगळं होऊन स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य बनलं. वेगळं होणं हा सिंगापूर आणि मलेशियाच्या सत्ताधारी पक्षांमधील खोल राजकीय आणि आर्थिक मतभेदांचा परिणाम होता, ज्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. या मतभेदांमुळे जुलै आणि सप्टेंबर 1964 मध्ये वांशिक दंगली देखील झाल्या होत्या.

1945: अमेरिकेकडून जपानच्या नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला

जगातील पहिला अणुबॉम्ब 6 ऑगस्ट 1945 च्या सकाळी जपानच्या हिरोशिमावर टाकल्यानंतर दुसऱ्या हल्ल्याचं नियोजन पाच दिवसानंतर करण्यात आलं होतं. 9 ऑगस्ट 1945 च्या सकाळी अमेरिकन फायटर विमानाने जपानच्या नागासाकी शहरावर दुसरा अणुबॉम्बचा हल्ला केला होता. त्यावेळी या औद्योगिक शहरात 600 चिनी आणि 10 हजार कोरियनसह एकूण 2.63 लाख लोक होते. अणुबॉम्बमुळे नागासाकीतील जवळपास 75 हजार लोकांचा जागीच मृत्यू झाला.

1975: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म (Mahesh Babu Birthday)

महेश बाबू हा एक तेलुगू अभिनेता आहे. त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडू येथे झाला. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला बालपणात सुरुवात केली. त्याचा 2003 चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ओक्कडू' हा त्या काळातील सर्वात मोठ्या तेलुगू चित्रपटांपैकी एक होता. महेश बाबू हा साऊथचा पॉप्युलर अभिनेता आहे, वयाच्या 47व्या वर्षीही तो अगदी तरुण दिसतो.

इतर महत्त्वाच्या घटना

1890: गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म.

1892: थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचं पेटंट मिळालं.

1901: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचं निधन.

1909: कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जान्म.

1925: चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशच्या काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.

1991: अभिनेत्री आणि मॉडेल हंसिका मोटवानीचा जन्म.

1996 : जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचं निधन.

2002: सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांचं निधन.

from maharashtra https://ift.tt/VwCIT6x
9th August In History: 'चले जाव' चळवळीची सुरुवात, अमेरिकेने नागासाकीवर दुसरा अणुबॉम्ब टाकला; आज इतिहासात
August 08, 2023
0
Tags