23rd August In History : आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताने आजच्या दिवशी अमेरिकेविरोधात हळदीच्या पेटंटची लढाई जिंकली होती. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी हळदीच्या औषधी गुणधर्माचे पेटंट मिळवले होते. त्यावर भारताने आक्षेप घेत कायदेशीर लढाई लढली. त्याशिवाय, मराठीमधील बालकवितेसह वास्तववादी कवितांमधून समाजाला आरसा दाखवणारे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा जन्म झाला. त्याशिवाय, सुप्रसिद्ध गायक केके यांचा जन्मदिन आहे.

1918 : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी विंदा करंदीकर यांचा जन्म

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर' हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार आदी पुरस्काराने गौरवण्यात आले.

विंदांच्या कविता या प्रयोगशील, वास्तवशील होत्या. त्यांच्या कवितांमधून सामाजिक, मार्क्सवादी राजकीय तत्त्वज्ञानाची झलक दिसून येत असे. त्यांच्या कवितांमधून विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य दिसून येत असे. विंदांनी मराठी काव्यमंजुषेत विविध घाटाच्या रंजक व वैचारिक काव्यलेखनाची भर घातल. त्यांनी मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या कवींच्या त्रयीने संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहचवल्या.

विंदांनी लिहिलेल्या बालकविताही चांगल्याच प्रसिद्ध झाल्या. 'अजबखाना', 'अडम तडम', 'एकदा काय झाले', 'एटू लोकांचा देश' हे बालकविता संग्रह प्रसिद्ध झाले.

1944 : अभिनेत्री सायरा बानो यांचा जन्म

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांचा आज जन्मदिन. सायरा बानो या 1960-70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1961 मध्ये आलेल्या जंगली या चित्रपटातून त्या प्रमुख अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर झळकल्या. झुक गया आसमान, आये मिलन की बेला, एप्रिल फूल, अमन, दिवाना, पडोसन, गोपी, पूरब और पश्चिम, हेराफेरी आदी चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. सायरा बानो या अभिनेते दिलीपकुमार यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. या दोघांमधील वयाचे अंतर 22 वर्षांचे होते. सायरा बानो यांनी दिलीपकुमार यांची अखेरपर्यंत काळजी घेतली.

1968 : सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नाथ उर्फ केके याचा जन्मदिन

कृष्णकुमार कुन्नथ अर्थात केके हा भारतातील लोकप्रिय गायकांपैकी होता. भारतातील सर्वोत्कृष्ट आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाणाऱ्या केके याने हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, बंगाली, आसामी आणि गुजरातीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली. 1999 मध्ये त्याने पल नावाचा त्याचा पहिला अल्बम लाँच केला. त्यातील पल आणि यारो ही गाणी आजही तरुणाईंच्या ओठांवर आहेत.

केकेच्या कारकिर्दीची सुरुवात ही जिंगल गाऊन झाली. 1994 मध्ये त्याने पहिल्यांदा जिंगल गायली. आपल्या कारकिर्दीत त्याने 3500 हून जिंगल्स गायल्या. हम दिल दे चुके सनम (1999) मधील "तडप तडप के इस दिल से" या गाण्याने त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'माचिस' या चित्रपटातील छोड आये हम या गाण्यातील छोटा भाग त्याने गायला होता.

"तडप तडप" (हम दिल दे चुके सनम), "आँखो में तेरी" (ओम शांती ओम), "दस बहाने" (दस), "तु ही मेरी शब है" (गँगस्टर), "खुदा जाने" (बचना ऐ हसीनों) आदी गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली.

अनेकांच्या आयुष्यात सुख-दु:खात केकेने गायलेल्या गाण्यांनी सोबत केली. केकेचा आवाज हा प्रेमाचा आवाज होता. 31 मे 2022 रोजी केके हा कोलकातामधील एका कॉन्सर्टमध्ये गात असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचे निधन झाले.

1997 : अमेरिकेविरोधात हळदीच्या पेटंटची कायदेशीर लढाई भारताने जिंकली

आजचा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताने कायदेशीर लढाईत बलाढ्य अमेरिकेला नमवले. हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

1995 मध्ये अमेरिकेतील मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांना हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळालं. त्यानंतर हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. भारताने निकराने आपली बाजू मांडली आणि अखेर हा लढा जिंकत हळद ही भारताचीच असल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले. भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी या लढ्यात खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. भारताकडून हा खटला भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने लढला. त्यावेळी भारताने दावा केला होता की, हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपारिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे. यानंतर पीटीओने (PTO) 23 ऑगस्ट 1997 मध्ये दोन्ही संशोधकांचे पेटंट रद्द केले. एखाद्या विकसनशील देशाच्या पारंपरिक ज्ञानाला मान्यता देण्याच्या बाबतीत हळदीवरील पेटंटची केस हा एक मैलाचा दगड ठरला.

हळदीचं पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघेही भारतीय होते. अमेरिकन पेटंट कार्यालयात ते तपासणारा कुमार हा पेटंट परीक्षकही भारतीयच होता.

इतर महत्त्वाच्या घटना

1806: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन
1942: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.
1966: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.
1971: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन
1973: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.
1990: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
2011: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

from maharashtra https://ift.tt/TJzhM9v
23rd August In History : अमेरिकेविरोधात हळदीच्या पेटंटची कायदेशीर लढाई भारताने जिंकली; आज इतिहासात...
August 22, 2023
0
Tags