23rd July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. प्रत्येक दिवशी काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या असतात. इतिहासात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करता येते. आजचा दिवसही असाच महत्त्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले भारतीयांच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक, तर, सशस्त्र क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा आज जन्म दिन आहे. तर, आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी पलटणच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा स्मृतीदिन आहे.

1856: लोकमान्य टिळक यांचा जन्म

भारतीय असंतोषाचे जनक समजले जाणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज जन्मदिन. लोकमान्य टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 'लाल-बाल-पाल' या त्रयींमधील ते एक होते. भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात.

टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते.

लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते ओळखले जात असे. टिळक हे कट्टर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. लोकमान्य टिळकांवर 1897 आणि 1908 मध्ये असे दोन वेळेस राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले आहे. 1906 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. 1908 मध्ये त्यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. 1914 मध्ये कारावासातून सुटका झाली.

चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली.

1881 ते 1920 या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', आदी अग्रलेख चांगलीच गाजली.

पुण्यात 1897 मध्ये आलेली प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी ब्रिटीश सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली होती. उंदीर नष्ट करण्यासाठी सरकारने सक्तीची प्लेगविरोधी फवारणी सुरू केली. तेव्हा पुणेकरांनी याला विरोध केला. ब्रिटिशांनी लष्कराच्या मदतीने जबरदस्तीने घरात घुसून फवारणी करण्यास सुरुवात केली. प्रसंगी ब्रिटिशांकडून घरातील साहित्य, कपडे जाळली जात असे. त्यावर मोठा असंतोष निर्माण झाला होता. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा अग्रलेख लिहिला.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने, 1880 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची सह-स्थापना केली. या शिक्षण संस्थेने पुण्यात महाविद्यालयेही सुरू केली.

1906 : थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. 1921 मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हा वयाच्या 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

काकोरी कटानंतर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. यामध्ये राम प्रसाद बिस्मिल, अशाफाकउल्लाह खान सारख्या क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची भगत सिंह, सुखदेव यांच्या मदतीने हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नवीन नावाखाली संघटनेची पुनर्बांधणी केली. या संघटनेचे ते लष्करी विभागाचे प्रमुख होते.

2004: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन

उत्तम अभिनय, उत्तम अवगत असलेली संगीत कला आणि विनोदाचा अचूक टायमिंग यामुळे अभिनेते मेहमूद यांनी दर्शकांना नेहमीच निखळ मनोरंजनचा आनंद दिला. अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नावारूपाला आलेले मेहमूद बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेते म्हणून आजही ओळखले जातात. त्यांच्या आई मुमताज अली 1940-50 च्या दशकामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका म्हणून ओळखल्या जात असत. 1958 साली प्रदर्शित झालेल्या ‘परवरिश’ या चित्रपटामध्ये मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेनंतर मेहमूद यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली. त्यानंतर आलेल्या प्यासा, सीआयडी, ससुराल, गृहस्थी, लव्ह इन टोकियो, पडोसन, भूत बंगला, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांना मोठी लोकप्रियता लाभली. आजच्या काळामध्येही हे चित्रपट ‘एव्हरग्रीन’ म्हणून ओळखले जातात.

‘कुंवारा बाप’ चित्रपटातून मेहमूद यांनी पोलिओग्रस्त मुलाची कथा मांडली होती. विनोदाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या मेहमूद यांनी या चित्रपटांतून मात्र रडवले. या चित्रपटातील कथा मेहमूद यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जाते. त्यांच्या मुलालादेखील पोलिओ झाला होता.

प्रसिद्धीच्या झोतात असूनही मेहमूद नेहमी जमिनीशी जोडलेले राहिले. त्यांनी बऱ्याच कलाकार आणि लोकांची मदत केली. ते स्वत: गरीबीतून आले असल्याने त्यांना गरीबीची जाण होती, त्यामुळे त्यांनी बऱ्याच लोकांना आर्थिक मदतही केली.

2012 : आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन

भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी, आझाद हिंद सेनेच्या 'झाशीची राणी फलटणी'च्या पहिल्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे आजच्या दिवशी निधन झाले.

लग्नापूर्वी त्यांचे लक्ष्मी एस. स्वामीनाथन असे नाव होते. मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला गेल्या (१९४०). तिथे त्यांनी भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना उघडला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पुढे 2 जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी, अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली. लक्ष्मींना महिला आणि बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. 1944 पर्यंत सुमारे एक हजार महिला जवान व पाचशे परिचारिका जवान अशी पंधराशेची पलटण झाली. जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या महिला सैनिकांनी ब्रिटिशांना नामोहरम केले.

अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पतकरली. तेव्हा आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. त्यांना रंगूनमध्ये अटक करण्यात आली. एक वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या. भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सहगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. (कर्नल प्रेमकुमार सहगल हे गाजलेल्या 'लाल किल्ला खटल्या'तील एक आरोपी होते. या खटल्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांची बाजू मांडली.) पुढे 1947 मध्ये सहगल हे कानपूरमध्ये स्थायिक झाले. तर, लक्ष्मी सहगल यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले. त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या. पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्याशिवाय, बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या, वैद्यकीय मदत केली. भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा दिली.

आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली. भारत सरकारने 1998 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी 2002 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक डाव्या आघाडीच्यावतीने लढवली होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविरोधात त्यांचा पराभव झाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या माजी खासदार सुभाषिणी अली आणि अनिसा पुरी या त्यांच्या कन्या आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी मृणालिनी साराभाई या कॅप्टन सहगल यांच्या धाकट्या भगिनी होत.

इतर घटना:

1917: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.
1927: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.
1947: अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचा जन्म.
1953: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.
1961: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.
1973: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
1986: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.
1999: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन.

from maharashtra https://ift.tt/HSzpVXg
23rd July In History: लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद यांचा जन्म, आझाद हिंद सेनेच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन; आज इतिहासात
July 22, 2023
0
Tags