मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार असून रायगडमधील इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर आज महत्त्वाची चर्चा होणार आहे. तसेच डोंगरांच्या पायथ्याला असलेल्या गावांच्याबद्दल काय खबरदारीचे उपाय करायचे यावरही आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

इर्शाळवाडीमध्ये आजही शोधमोहीम सुरू

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गुरूवारी संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचावकार्यात अडथळे येत होते, त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. आज सकाळी 6.30 वाजता हे बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

कोकणातील शाळांना सुट्टी

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या तीन जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसंच या जिल्ह्यामधल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, त्यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईत आज शाळा सुरू राहणार असून पावसाची परिस्थिती पाहून इतर निर्णय घेतली जातील असं प्रशासनाने सांगितलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक

राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज सकाळी 10 वाजता होत असून, या बैठकीत इर्शाळवाडीतील दुर्घटनेबद्दल महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याचसोबत राज्यातील डोंगरदऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांबाबत काय उपाययोजना करता येईल यावर देखील बैठकीत निर्णय होणार आहे.

विधानसभेचे अधिवेशन

खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये घडलेल्या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही, यावर विरोधकानी आवाज उठवत सरकराला गुरुवारी धारेवर धरलं होतं. आजही या विषयावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सुजित पाटकर यांना सात दिवसांची पोलिस कोठडी

ईडीने आज कोविड घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केला असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचीही चौकशी केली होती. त्यामुळे आता पुढील अटकेचा नंबर कोणाचा यावरील सर्वांचा लक्ष लागलेलं आहे.

लवासा प्रकरणावर आज सुनावणी

पुण्यातील लवासा प्रकरणात पवार कुटुंबियाविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश द्या, अशी मागणी करत मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे

कोल्हापुरात पंचगंगेची पातळी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता

कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही वाढतच आहे. सध्या पंचगंगा नदी ही 34 फुटांवरून वाहत आहे. पावसाचा जोर रात्रभर असाच सुरू राहिला तर आज पंचगंगा इशारा पातळी गाठू शकते. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी तर 43 फूट ही धोका पातळी आहे.

from maharashtra https://ift.tt/GpcXqkO
21st July Headline: इर्शाळवाडीमध्ये शोधमोहीम सुरू, कोकणातील शाळांना आज सुट्टी; आज दिवसभरात
July 20, 2023
0
Tags