रायगड: अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, आपले शिवराय राजं झालं.... आणि श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीबांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शिवबा सिंहासनावर आरूढ झाले. हे घडत असताना अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, झाडांची सळसळ वाढली. पशुपक्षांनी केलेल्या चिवचिवाटाच्या आनंदलहरी अवघ्या महाराष्ट्रावर पसरल्या. सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 349 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे. हा सोहळा 6 जूनपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर गोंधळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं..

आज सकाळी 7 ते 12 या वेळेत किल्ले रायगडावर राज्याभिषेकाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावरती मोठी लगबग दिसून येत आहे. अनेकांनी पुढील दोन ते चार दिवसाचा मुक्काम हा किल्ले रायगडावरती केलेला आहे. दरम्यान मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांची जेवण, न्याहरीची सर्व सोय किल्ल्यावरतीच करण्यात आलेली आहे. दरम्यान हा एक वेगळा अनुभव असल्याची प्रतिक्रिया इथं आलेल्या शिवभक्तांनी दिली आहे.

2 जून -

सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा

सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा

सकाळी 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा

सकाळी 11 वाजता शिवपालखी सोहळा

राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह इथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.

गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे.

शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत.

गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.

रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येईल

याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.

from maharashtra https://ift.tt/rlAtjEy
अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, शिवबा सिंहासनाधीश्वर झाले...; आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन
June 01, 2023
0
Tags