1st June in History: आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राची लाइफलाइन एसटी बस सेवेची सुरुवात झाली. तर, भारतीय चित्रपट सृष्टीत आपले दर्जेदार कलाकृतींना जन्म देणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचा स्थापना दिवस आज आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन ही एक्स्प्रेसही आजच्या दिवशी सुरू झाली होती.

1929: प्रभात फिल्म कंपनीची स्थापना

विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती. प्रभात फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात झाली होती. 1932 मध्ये प्रभातचे कार्यालय पुण्यात नेण्यात आले. 1929 ते 1949 या कालावधीत प्रभात फिल्म कंपनीने 20 मराठी, 29 हिंदी आणि २ तमिळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे 1952 साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. प्रभातने निर्मिती केलेली अनेक चित्रपटे गाजली. आजही या चित्रपटांची चर्चा होत असते. 'अयोध्येचा राजा' हा 1932 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला मराठी चित्रपट 'प्रभात'चा होता.

गोपाल कृष्ण (1929), खूनी खंजर (1930), रानी साहेबा (1930), उदयकाल (1930) या मूकपटाची निर्मिती प्रभातने केली. तर, अयोध्याचा राजा (1932), माया मछिंद्रा (1932), धर्मात्मा (1935)
चंद्रसेना (1935), अमर ज्योति (1936),संत तुकाराम (1936)
राजपूत रमानी (1936), कुंकू (1937), शेजारी (1941) आदी चित्रपटे चांगलीच गाजली.

1929: अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जन्म

फातिमा रशिद उर्फ नर्गिस दत्त या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. आपल्या तीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी आग, मदर इंडिया, आवारा, बरसात, श्री ४२० आणि चोरी चोरी यांसह अनेक यशस्वी चित्रपटांतून अभिनय केला.

नर्गिस यांनी बाल कलाकार म्हणून 1935 मध्ये तलाश-ए-इश्क या सिनेमाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तर अभिनेत्री म्हणून कारकिर्दीस सुरुवात 1942 साली तमन्ना या चित्रपटाने केली. तेव्हापासून सालापासून ते 1960 च्या दशकापर्यंत वीस वर्षांच्या कारकिर्दीत नर्गिस यांनी अनेक सिनेमांतून कामे केली. राज कपूर आणि नर्गिस यांच्या ऑन स्क्रिन जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. मदर इंडिया चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेते सुनील दत्त यांनी त्यांना आगीतून वाचवले होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि ते विवाहबद्ध झाले. नर्गिस या राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार होत्या.

कर्करोगासारखा जीवघेण्या आजाराने नर्गिस यांनी वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नर्गिस यांचे पती आणि अभिनेते सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या स्मरणार्थ नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर फाउंडेशनची स्थापना केली.

1930: मुंबई व पुणे दरम्यान 'दख्खनची राणी' ही रेल्वेगाडी सुरू Deccan Queen

मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या 'दख्खनची राणी'(Deccan Queen) या रेल्वेची सुरुवात आजच्या दिवशी झाली. घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी सुरू झालेली ही एक्स्प्रेस फक्त शनिवार-रविवारी धावत असे. त्यानंतर डेक्कन क्वीनच्या सेवेचा विस्तार करण्यात आला. सुरुवातीला ही गाडी लकझरी गाडी म्हणून सुरू झाली, त्यामुळे तिच्यात फक्त वरचे दोन वर्ग होते. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा झाला. आता ती कल्याणला थांबत नाही. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर हे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते. जवळपास 93 वर्ष ही रेल्वे अविरतपणे प्रवाशांच्या सेवेत आहे. भारतीय रेल्वेत जुन्या एक्स्प्रेसपैकी एक एक्स्प्रेस आहे.

1934: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन

प्रतिभावंत साहित्यिक, समीक्षक, विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे आजच्या दिवशी निधन झाले. 'बहु असोत सुंदर, संपन्न की महा' या गीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.

कोल्हटकर हे मराठीतील विनोदाबरोबरच साहित्य समीक्षेच्या क्षेत्रातही अग्रणी होते. कोल्हटकरांनी 12 नाटकेही लिहिली. कविता, लघुकथा आणि कादंबऱ्यांचे त्यांनी लेखन केले. वाचकांचे मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक सुधारणा हा कोल्हटकरांच्या लेखनाचा एक महत्त्वाचा उद्देश होता. राम गणेश गडकरी, विष्णू सखाराम खांडेकर, गजानन त्र्यंबक माडखोलकर, भार्गवराम विठ्ठल वरेरकर, प्रल्हाद केशव अत्रे या लेखकांनी त्यांचा गुरू म्हणून गौरव केला. 1913मध्ये पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

1945 : टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना

टाटा मूलभूत संशोधन संस्था ही १९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे स्थापन झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून 400 पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो.

पदार्थविज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे, आदी उद्दिष्ट्य आहेत.

1948: अहमदनगर-पुणे दरम्यान पहिली एसटी बस धावली

महाराष्ट्राच्या रस्त्यावर पहिली एसटी बस 1 जून 1948 रोजी धावली. किसन राऊत हे एसटी बसचे पहिले चालक तर लक्ष्मण केवटे हे एसटीचे पहिले वाहक होते. पहिल्या लालपरीला एक लाकडी बॉडी आणि वरुन कापडी छप्पर होतं. लाकडी बॉडी असलेल्या या पहिल्या बसची आसन क्षमता 30 होती. 1 जून 1948 रोजी सकाळी ठिक 8 वाजता ही पहिली एसटी बस अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने निघाली. पहिल्या एसटी बसचे तिकीट अडीच रुपये होते.

एसटीला अहमदनगर ते पुणे प्रवासादरम्यान चास, सुपा, शिरुर, लोणीकंद अशी गावं लागली. गावागावांमध्ये लोक बसचं जल्लोषात स्वागत करत. काही ठिकाणी एसटीची पूजादेखील करण्यात आली. पुण्यामध्ये शिवाजीनगर जवळच्या कॉर्पोरेशन जवळ या बसचा शेवटचा थांबा होता. मात्र त्यावेळी पुण्यात अवैध वाहतूक जोरात होती. राज्य महामंडळाची बस सुरु झाल्यानं या अवैध वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एसटीवर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारने गांभीर्याने घेतली होती. त्यामुळे पुण्यात एसटीने प्रवेश केल्यापासून म्हणजेच माळीवाडा वेशीपासून ही बस पोलीस बंदोबस्तात कॉर्पोरेशनपर्यंत आणण्यात आली. 'गाव तेथे एसटी' या बिरुदाला एसटी महामंडळ जागलं असल्याने ग्रामीण महाराष्ट्रासाठी एसटी बस अर्थात लाल परी ही जीवनवाहिनी आहे.

1998: साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते. यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली.

1970 : हिंदी चित्रपट अभिनेते आर. माधवन यांचा जन्म

माधवन रंगनाथन अर्थात सिनेप्रेमींसाठी आर. माधवन या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेच्या आज वाढदिवस आहे. तमिळ चित्रपटांशिवाय त्याने काही कन्नड, हिंदी, तेलुगू, इंग्लिश व मलय भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या आहेत. माधवन याने चार फिल्मफेअर पुरस्कार आणि तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारांसह इतर पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. रोमँटिक भूमिका साकारलेले अनेक चित्रपटही गाजले आहेत. त्याशिवाय रंग दे बसंती, गुरू, 3 इडियट्स सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्याने साकारलेल्या वेगळ्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

इतर महत्त्वाच्या घटना:

1831: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
1842: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म.
1843: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म.
1961: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
1985: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.
2001: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
2002: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन.

from maharashtra https://ift.tt/B2nEWTV
1st June in History: 'डेक्कन क्वीन' आणि एसटी बस सेवेची सुरुवात, प्रभात फिल्म कंपनीची स्थापना; आज इतिहासात
May 31, 2023
0
Tags