19th May In History: भारतीय इतिहासासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्याच दिवशी संत ज्ञानेश्वरांच्या बहीण संत मुक्ताबाई यांचे तसेच टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन झाले. तुर्कस्तानचा चेहरामोहरा बदलवणाऱ्या अतातुर्क केमाल पाशा यांचा जन्म झाला.

1297 : संत ज्ञानदेव यांच्या बहिण मुक्ताबाई यांचे निधन

संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहिण संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत आणि निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. 19 मे 1297 रोजी त्यांचे निधन झाले.

1536 : इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याच्या पत्नीचा शिरच्छेद

19 मे 1536 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्या पत्नी अॅन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला होता.

1604 : कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना

कॅनडातील मॉन्ट्रिआल शहराची स्थापना 19 मे 1604 रोजी झाली. मॉन्ट्रिआल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे. मॉन्ट्रिआल शहरातील नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. तसेच हे जगातील सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे.

1743 : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी केली विकसित

जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी 19 मे 1743 रोजी विकसित केली.

1881- तुर्कस्तानचे संस्थापक केमाल पाशा यांचा जन्म

केमाल अतातुर्क उर्फ मुस्तफा केमाल पाशा (Mustafa Kemal Pasha) यांचा जन्म 19 मे 1881 रोजी झाला. केमाल पाशा हे तुर्की फील्ड मार्शल, क्रांतिकारी राजकारणी, लेखक आणि तुर्की प्रजासत्ताकचे संस्थापक होते. त्यांनी 1923 ते 1938 पर्यंत तुर्कस्तानचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी प्रगतीशील सुधारणा सुरू केल्या ज्याने तुर्कस्तानला धर्मनिरपेक्ष, औद्योगिक राष्ट्रात रूपांतरित केले. वैचारिकदृष्ट्या एक धर्मनिरपेक्षतावादी आणि राष्ट्रवादी, केमाल अतातुर्कची धोरणे आणि तत्त्वे केमालवाद म्हणून ओळखली जातात. त्याच्या लष्करी आणि राजकीय कामगिरीमुळे, अतातुर्क 20 व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.

1904 : जमशेदजी टाटा यांचे निधन

मिठापासून आलिशान मोटारींपर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहाचे (Tata) संस्थापक जमशेदजी टाटा (Jamsetji Tata) यांचे 19 मे 1904 रोजी निधन झाले. जमशेदजी टाटा हे आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार असण्यासोबत टाटा उद्योग समूहाचे संस्थापकदेखील होते. जमशेदजी टाटा यांचा जन्म 1839 मध्ये गुजरातमधील नवसारी या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नौशेरवानजी आणि आईचे नाव जीवनबाई टाटा होते. नौशेरवानजी हे पारशी धर्मगुरूंच्या कुटुंबातील पहिले व्यापारी होते. नशिबाने त्यांना मुंबईत आणले, जिथे त्यांनी व्यवसाय सुरू केला. जमशेटजींनी वयाच्या 14 व्या वर्षीच आपल्या वडिलांना साथ देण्यास सुरुवात केली. जमशेटजींनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि शिक्षणादरम्यान त्यांनी हिराबाई दाबूशी लग्न केले. 1858 मध्ये ते पदवीधर झाले आणि वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे सामील झाले. त्यांनी टाटा उद्योग समूहाची स्थापना केली आणि त्याचा विस्तार केला. टाटा समूह म्हणजे भारतातील एक विश्वासार्ह उद्योग समूह असं म्हटलं जातं.

1910 : हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला

हॅले धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल 76 वर्षांइतका आहे. 19 मे 1910 रोजी हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता.

1911 : पार्कस कॅनडा जगातील पहिल्या उद्यान सेवेला सुरुवात

19 मे 1911 रोजी पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली.

1913 : माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म

भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी (Neelam Sanjiva Reddy) यांचा 19 मे 1913 रोजी जन्म झाला. स्वातंत्र्य चळवळीतील ते एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या बहुविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. ऑक्टोबर 1956 मध्ये ते आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री बनले आणि 1962 ते 1964 या काळात त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवले. 1959 ते 1962 पर्यंत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले.

नीलम संजीव रेड्डी हे भारताच्या सहावे राष्ट्रपती होते. त्यांचा कार्यकाळ 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 असा होता. आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीलम संजीव रेड्डी यांची एक कवी, अनुभवी राजकारणी आणि कार्यक्षम प्रशासक अशी प्रतिमा होती. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा जनता पक्ष या नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्षाने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले.

1934 : रस्किन बॉंड यांचा जन्म

इंग्रजी भाषेतील जगप्रसिद्ध भारतीय लेखक रस्किन बाँड (Ruskin Bond) यांचा जन्म 19 मे 1934 रोजी झाला. शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. 'द रुम ऑन द रूफ' या त्यांच्या पहिल्या कादंबरीला 1957 मध्ये जॉन लेवेलीन राइस पारितोषिक मिळाले. 'आवर ट्रीज़ स्टिल ग्रो इन देहरा' या त्यांच्या इंग्रजी कादंबरीसाठी 1992 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाँड यांनी लहान मुलांसाठी शेकडो कथा, निबंध, कादंबरी आणि पुस्तके लिहिली. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी 500 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. ललित लेखनासाठी रस्किन बॉंड प्रसिद्ध होते.

1938 : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरिश कर्नाड यांचा जन्म

गिरीश कर्नाड (Girish Karnad) हे भारतातील प्रसिद्ध समकालीन लेखक, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार होते. त्यांचा जन्म 19 मे 1938 रोजी झाला. त्यांचे लेखन कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये तितकेच चांगले चालत असे. 1998 मध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार विजेते कर्नाड यांना मिळाले. त्यांनी रचलेली तुघलक, हयवदन, तालेदंड (रक्त कल्याण), नागमंडल आणि ययाती ही नाटके खूप लोकप्रिय झाली आणि भारतातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली.

2008 : मराठी साहित्यिक, नाटककार विजय तेंडुलकर यांचे निधन

प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, निबंधकार, चित्रपट आणि टीव्ही पटकथा लेखक, राजकीय पत्रकार आणि सामाजिक भाष्यकार अशी विविधांगी ओळख असलेल्या विजय तेंडुलकर (Vijay Tendulkar) यांचे 19 मे 2008 रोजी निधन झालं. भारतीय नाट्य आणि साहित्यविश्वात त्यांचे मानाचे स्थान आहे. सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या जगात एक पटकथा लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

विजय तेंडुलकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच पहिली कथा लिहिली. वडील नोकरीबरोबरच प्रकाशनाचा छोटासा व्यवसाय करत, त्यामुळे त्यांना घरातच वाचन-लेखनाचे वातावरण मिळाले. नाटके पाहत मोठे झालेल्या विजय तेंडुलकरांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिले नाटक लिहिले, त्यात अभिनय केला आणि दिग्दर्शन केले. लेखनाच्या सुरुवातीच्या काळात विजय वृत्तपत्रांमध्ये काम करत असे. भारत छोडो आंदोलनातही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात ते 'मुंबई चाळ'मध्ये राहत होते. 'चाळ'मधून जमलेल्या सर्जनशीलतेची बीजे मराठी नाटकांमध्ये गेल्या काही वर्षांत अंकुरलेली दिसली. 1984 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. मी जिंकलो मी हरलो, शांतता! कोर्ट चालू आहे, श्रीमंत, सखाराम बाईंडर, सरी गं सरी ही त्यांची काही प्रसिद्ध नाटकं आहे.

from maharashtra https://ift.tt/GrjI3Z5
19th May In History: केमाल पाशा, नीलम संजीव रेड्डी आणि रस्किन बॉंड यांचा जन्म, हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला; आज इतिहासात
May 18, 2023
0
Tags