On This Day In History: आजचा दिवस भारताच्या आणि जगाच्या इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 10 मे 1526 रोजी पानिपतची लढाई जिंकल्यानंतर बाबरने देशाची तत्कालीन राजधानी आग्रा येथे पाऊल ठेवले आणि मुघल राजवट स्थापन करून आपल्या देशाचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. जगात दररोज काही ना काही विक्रम केले जातात आणि मोडले जातात, परंतु प्रथम यश मिळवणाऱ्याचे नाव नेहमीच लक्षात राहते. हरियाणाच्या संतोष यादवने 10 मे 1993 रोजी सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आणि असे करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 10 मे या तारखेला नोंदवलेल्या इतर काही महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1526 - पानिपतचे युद्ध जिंकून बाबर आग्र्याला आला

पानिपतच्या पहिल्या लढाईत (First Battle of Panipat) बाबरने (Babur) इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि 10 मे 1526 रोजी त्यावेळची राजधानी आग्र्यामध्ये प्रवेश केला. पानिपत हे भारतीय इतिहासातील तीन मोठ्या युद्धांचे साक्षीदार आहे. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526 रोजी दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात झाली. बाबरच्या सैन्याने इब्राहिम लोधीच्या एक लाखाहून अधिक सैनिकांचा पराभव केला. अशा प्रकारे पानिपतच्या पहिल्या लढाईने बहलूल लोदीने भारतात स्थापन केलेल्या लोदी घराण्याचा अंत झाला आणि दिल्लीमध्ये मुघल राजवटीची (Mughal Empire) स्थापना झाली. पुढे मुघल राजवटीने देशावर 250 वर्षे राज्य केलं.

1655: ब्रिटीश सैन्याने जमैका ताब्यात घेतला

जमैका (Jamaica) हा देश कॅरिबियन बेटातील देश असून याचे भौगोलिक क्षेत्र हे 10,990 चौकिमी इतकं आहे. हे बेट वेस्ट इंडिज बेटांचा एक भाग आहे आणि कॅरिबियनमधील चौथा सर्वात मोठा देश आहे. या देशात अरावक आणि टायनो जमातींचे लोक राहत होते. कोलंबसने शोध लावल्यानंतर हा देश स्पेनच्या अधिपत्याखाली आला. नंतर 10 मे 1655 रोजी इंग्लंडने स्पेनचा पराभव केला आणि त्यावर ताबा मिळवला. नंतरच्या काळात इंग्लंडची वसाहत म्हणून जमैका जगातील आघाडीच्या साखर उत्पादकांपैकी एक बनला. 6 ऑगस्ट 1962 रोजी देशाला वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.

1857: मेरठच्या सैनिकांचे बंड आणि 1857 च्या उठावाला सुरुवात

ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात (Indian Rebellion of 1857) आजच्याच दिवसी झाली. 10 मे 1857 रोजी मेरठच्या तीन रेजिमेंटच्या सैनिकांनी बंडाचा झेंडा फडकावला आणि दिल्लीकडे कूच केले. यामध्ये महिलांनीही त्यांना सहकार्य केले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी ते दडपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पुढे जाऊन देशभर उठाव झाले आणि ब्रिटिशांना पहिला धक्का बसला. कसंतरी करुन ब्रिटिशांनी 1857 बंड दडपले.

1945: रशियन सैन्याने झेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग ताब्यात घेतले.

1959: सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानात पोहोचले.

1972: अमेरिकेने नेवाडा येथे अणुचाचणी केली.

1993: दोनदा एव्हरेस्ट गाठणारी संतोष यादव पहिली महिला गिर्यारोहक.

भारतातील प्रसिद्ध गिर्यारोहक संतोष यादव (Santosh Yadav) हिने दोनदा एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला. पहिल्यांदा 1992 साली आणि 10 मे 1993 रोजी तिने दुसऱ्यांदा एवरेस्ट सर केले. अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली महिला गिर्यारोहक ठरली. या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा 2000 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव केला.

1994: नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले

वर्णभेद संपवण्यासाठी आयुष्यभर लढणारे आणि आफ्रिकेचे गांधी म्हणून प्रसिद्ध असणारे नेल्सम मंडेला (Nelson Mandela) हे 10 मे 1994 रोजी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय माजी राष्ट्राध्यक्ष होते. राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि दक्षिण आफ्रिकेतील शतकानुशतके वर्णभेदाला विरोध करणाऱ्या उमखोंटो वी सिझवे या शाखेचे अध्यक्ष होते. वर्णद्वेषविरोधी लढ्यामुळे त्यांना रॉबेन बेटावर 27 वर्षे तुरुंगात घालवावी लागली होती. त्या ठिकाणी त्यांना कोळसा खाण कामगार म्हणून काम करावे लागले. दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील वर्णभेदाच्या विरोधाचे ते प्रतीक बनले. संयुक्त राष्ट्र संघाने नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

नेल्सन मंडेला हे महात्मा गांधींजींप्रमाणे अहिंसक मार्गाचे समर्थक होते. त्यांनी गांधींना प्रेरणास्रोत मानले आणि त्यांचा अहिंसेचा विचार जगभर पसरवला. 1993 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

from maharashtra https://ift.tt/rSb3mIu
10th May In History: पानिपतचे पहिले युद्ध जिंकून बाबर आग्र्यामध्ये आला, 1857 च्या उठावाला मेरठमधून सुरुवात; आज इतिहासात
May 09, 2023
0
Tags