Bhiwandi Building Collapse : भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील इमारत कोसळल्याच्या (Bhiwandi Building Collapse) दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अनेकजण अजूनही अडकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे. तर जखमींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी झालेल्यांची भेटही मुख्यमंत्र्यांनी घेतली.

भिवंडीतील वर्धमान कंपाउंडमधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. आणखी काही लोक इमारतीच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचे गोडाऊन होते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये भाडेतत्वावर नागरिक राहत होते.

या घटनेत एकूण 22 जण डिगार्‍याखाली दाबले गेले असल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी 12 जणांना या ढिगाऱ्याखालून रात्री 11 पर्यंत बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही या इमारतीच्या ढिकाऱ्याखाली अडकलेल्या 10 लोकांचा शोध एनडीआरएफ, टी डी आर एफ आणि इतर यंत्रणांच्याच्या माध्यमातून सुरू आहे. रात्रभर शर्तीचे प्रयत्न करत शोधकार्य सुरू होते, त्यात कोणीही व्यक्ती रात्रीत सापडली नाही. सध्याही शोध मोहीम सुरू आहे.

2014 मध्ये इंद्रपाला गुरुनाथ पाटील यांनी बांधली होती इमारत

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पोलीस यंत्रणा दाखल होऊन बचावकार्य सुरु केले होते. त्यांनतर ठाणे येथील टीडीआरएफ पथक दाखल होत बचाव कार्य सुरू करण्यात आले. तर भिवंडीत झालेल्या वाहतूक कोंडीमुळं एनडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचायला एक ते दीड तास अडकून पडले होते. वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथील वर्धमान ही तळ अधिक तीन मजली इमारत होती. ही इमारत 2014 मध्ये इंद्रपाला गुरुनाथ पाटील यांनी बनवली असून जमीन मालक देखील तेच होते. या इमारतीच्या तळमजल्यावर एम आर के फुड्स या कंपनीचे चायनीज फूड प्रोडक्ट सप्लाय करणारे गोदाम असून पहिल्या मजल्यावर साठवणुकीचे गोदाम आहे. एम आर के फुडस कंपनीमध्ये सुमारे 55 कामगार होते. जेवणाची वेळ असल्यानं अनेक कामगार गोदामाबाहेर असल्यानं अनेकांना जीवदान मिळाले असून, या कंपनीत अजून सात जण अडकल्याची भीती तेथील कामगार अनिल तायडे याने सुरुवातीला व्यक्त केली आहे.

बांधकामात सुरक्षेची बाब लक्षात घेतली नाही

इमारतीवरील दोन मजले हे रहिवासी वापरासाठी होते. ज्यात 27 ते 30 खोल्या बनविण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे या कमकुवत इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. ज्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता. इमारतीच्या बांधकामात सुरक्षेची कोणतीही बाब बांधकाम विकासकाने लक्षात घेतलेली नसल्याने इमारत कोसळली आहे.

दरम्यान, या घटनास्थळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तहसिलदार अधिक पाटील,पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, उपविभागीय अमित सानप, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्यासह महसूल, पोलीस आणि बचाव व वैद्यकीय पथक उपस्थित होते. भिवंडीतील ग्रामीण भागातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली असून, या भागात एम एम आर डी ए महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायत हे वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत आहेत. यापैकी एकाने जबाबदारीने घेऊन येथील दुर्घटना टाळण्यासाठी सर्वेक्षण करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मंत्री कपिल पाटील यांनी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/hFTbSpa News Update : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात वाडा कोसळला! दोघे जण जखमी

from maharashtra https://ift.tt/cidsPoW
Bhiwandi : भिवंडी इमारत दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर नऊ जण जखमी; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
April 29, 2023
0
Tags