27 March In History : 27 मार्च रोजी भारताच्या आणि जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आज जगभरात जागतिक रंगभूमी दिवस साजरा केला जातो. तर, जगातील पहिला अंतराळवीर युरी गागरीन यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यासह इतिहासातही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

जागतिक रंगभूमी दिवस World Theatre Day

27 मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो.

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. नाटक हे वेगवेगळ्या भाषांमधून सादर केले जाते. विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्याआधी महात्मा फुले यांनी अश्वघोष,तृतीय रत्नकार या नाटकांचे लिखाण केले होते. महात्मा फुले यांच्या नाटकाचा प्रयोगच होऊ शकला नाही. ब्रिटिशांनी त्यांना प्रयोग करण्याची परवानगी दिली नव्हती.

1667 : नेताजी पालकर यांचे औरंगजेबाकडून धर्मांतरण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून यशस्वी सुटका केल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान 19 ऑगस्ट 1666 रोजी काढले. त्यावेळी नेताजी पालकर हे बीडजवळील मुघलांच्या छावणीत होते. २४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. त्यानंतर त्यांना आग्रा येथे पाठवण्यात आले. नेताजी पालकर यांचे मुघल सैन्याने हाल केले. त्यानंतर नेताजी पालकर हे धर्मांतरास तयार झाले. अखेर 7 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले. पुढे 1676 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले.

1845 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनीतील लेनेप येथे झाला. क्ष-किरणांचा शोध अपघाताने एका प्रयोगाच्या दरम्यान लागला. क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या शोधामुळे प्रा. राँटजेन यांना 1901 साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या या शोधाची वैद्यकीय क्षेत्राला मोठी मदत मिळाली.

1898 : शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन

भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. भारतात मुस्लिमांसाठी आधुनिक शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. त्यांनी मुहम्मद अँग्लो ओरिएण्टल कॉलेजची स्थापना केली. पुढे याचे रुपांतर अलिगड मुस्लिम विद्यापीठात झाले. 1857 च्या बंडात त्यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली असल्याचे म्हटले जाते. मात्र, या बंडाबाबत त्यांनी असबाब-ए-बग़ावत-ए-हिन्द या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनी-ब्रिटिश सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांवर विश्वास ठेवू नये असे त्यांचे मत होते. त्यांनी विविध ठिकाणी शाळा सुरू केल्या.

1901: डोनाल्ड डक हे कार्टून रेखाटणारे कार्ल बार्क्स यांचा जन्म

कार्ल बार्क्स यांचा आज जन्म दिवस. कार्ल हे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक आणि चित्रकार होते. पहिल्या डोनाल्ड डक कथांचे लेखक होते. डिस्ने कॉमिक बुक्समधील स्क्रूज मॅकडकचे निर्माता म्हणून आणि इतर कामासाठी ते प्रसिद्ध आहेत.

1968 : पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन

पृथ्वीच्या वातावरणाचे कवच भेदून अंतराळात जाण्याचे आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची अशक्य कामगिरी सोव्हिएत युनियनने 1961 मध्ये करून केली होती. युरी गागारीन हे सोविएत हवाई दलातील वैमानिक जगातील पहिला अंतराळवीर ठरले. पृथ्वीप्रदक्षिणा करणारे ते पहिले अंतराळवीर होते. 27 मार्च 1968 रोजी जेट विमानाच्या एका छोट्या अपघातात युरी गागारीन यांचे निधन झाले.

from maharashtra https://ift.tt/p34Gw15
27 March In History : जागतिक रंगभूमी दिन, नेताजी पालकर यांचे धर्मांतरण, पहिला अंतराळवीर युरी गागरीन यांचे निधन; आज इतिहासात
March 26, 2023
0
Tags