Anant Chaturdashi 2022 : आज अनंत चतुर्दशी आहे. आज दहा दिवसांनी लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. आज दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीची धूम

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा नामगजरात आज बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. राज्यभरात आज दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. साश्रू नयनांनी गणेशभक्त बाप्पाचं विसर्जन करतील. मुंबईमध्ये बहुतेक सर्व बड्या गणेश मंडळाच्या गणपतींचं आज विसर्जन होईल. लालबाग, परळ सारख्या मोठी गणेश मंडळ असणाऱ्या भागात आज वेगळंच वातावरण पाहायला मिळेल. मुंबईमध्ये आज विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळेल. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर झाल्यानंतर यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे.

मुंबईचा राजापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईत लालबाग, परळ परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघेल. यामध्ये मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसाठी बाहेर काढला जातो. त्यानंतर इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले जातात.

पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त

राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर पहिल्यांदाच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी

आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.

from maharashtra https://ift.tt/JQtjfk3
Ganesh Visarjan 2022 Live Updates : मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ, विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला
September 08, 2022
0
Tags