Police Bharti Maharashtra 2022 Update – राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची मेगाभरती.
राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
Police Bharti Maharashtra 2022 Update
मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात 2019 तसेच 2020 मधील पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू असून 2021 अखेर रिक्त होणाऱ्या 10 हजार पदांची मागणी पोलीस महासंचालकांकडून करण्यात आली आहे. या 10 हजार पदांची भरती करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
• पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधांतून सूट देण्याचा निर्णय
• या निर्णयामुळे २० हजार पोलीस शिपायांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा
• सद्यस्थितीत ७ हजार २३९ पोलीसांची पदे भरण्याची कार्यवाही शासनाच्या मंजुरीमुळे सुरु
• या व्यतिरिक्त ११ हजार ४४३ पदे भरतीसाठी उपलब्ध
राज्यात पोलिसांची मेगा भरती
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा असून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गृह विभागाने आणि पोलिसांनी अधिक सतर्कतेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे.
एक महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी या वेळी दिल्या. राज्यातील कारागृह विभागातही सुधारणा करण्यात येणार आहेत. जेलमध्ये 1 हजार 641 कैदी असे आहेत की ज्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण पैसे नसल्याने किंवा कोणी व्यक्ती त्यांचा बाँड देऊ शकत नसल्याने ते अद्यापही जेलमध्येच आहेत. अशांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जामीन मिळवून देण्याच्या दृष्टीने मदत करण्यात येणार आहे.